मुंबई : लसीपाठोपाठ अमेरिकी कंपनी फायझर कंपनी (Fizer company) आता कोरोनावर कॅप्सूल (Corona capsule) काढण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी पी फायझर कंपनी मानवी चाचण्यादेखील सुरू करणार आहे. कंपनीचा दावा आहे की, कोरोनाची लक्षणं दिसताच ही गोळी जर घेतली, तर या आजाराचे गंभीर परिणाम भोगावे लागणार नाहीत.
फायझरचे मुख्य शास्त्रज्ञ मिका डोलस्टेन यांनी सांगितले आहे की,
ज्याप्रमाणे अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाहीये, आणि रुग्णसंख्या घटल्यानंतर पु्न्हा-पुन्हा वाढतेय, ते पाहता येत्या काळात परिस्थिती आणखीनच खराब होईल, अशी शक्यता दिसते.
त्यामुळे लसीबरोबरच कोरोना रुग्णांवरील उपचार या दोन्ही गोष्टींवर काम करणे गरजेचे आहे.
फायझर कंपनीचा दावा काय?
कंपनीचे म्हणणे आहे की, कोरोना रुग्णांची प्रकृती गंभीर होऊ नये, यासाठी ही गोळी लाभदायक ठरेल. या गोळीमुळे सुरूवातीच्या स्टेजलाच कोरोना रुग्णांना बरे करण्यात मदत होऊ शकते. ज्यामुळे महामारीची परिस्थिती बऱ्याच अंशी नियंत्रणात येईल.
कधी सुरू होणार ट्रायल?
एप्रिलमध्ये या गोळीचे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू होतील. ट्रायल पूर्ण झाली की, ड्रग कंट्रोलर विभागाकडे या गोळीच्या मंजुरीसाठी अर्ज केला जाईल.
किती दिवस घ्यावी लागेल गोळी?
मिका डोलस्टेन यांनी सांगितले आहे की, दिवसातून २ वेळा ही गोळी ५ दिवस घ्यावी लागेल. सुरूवातीला तरी ही गोळी कोरोनाची लक्षणं जाणवणाऱ्या लोकांसाठी असेल. मात्र निरोगी माणूसही ही गोळी घेऊन कोरोनापासून बचाव करू शकतो का, याबाबतही फायजर कंपनी संशोधन करणार आहे.