Girls Fighting For Birthday Party Bill: बर्थडे पार्टीसाठी एकत्र हॉटेलला जाणं काही नवीन गोष्ट नाही. मात्र बर्थडे पार्टीच्या बिलावरुन हॉटेलमध्येच वाद होण्याचा प्रकार फारच क्वचित होतो. पण खरोखर असा राडा तरुणींनी घातला. एका हॉटेलमध्ये काही मुली बर्थडे पार्टीसाठी गेल्या होत्या. मात्र बिल देण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्या वाद झाला. हा वाद इतक्या टोकाला पोहोचला की त्यांच्यात केवळ हाणामारी व्हायची बाकी होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा संपूर्ण प्रकार अमेरिकेतील आहे.
हा व्हिडीओ व्हिक्टर क्रिश्चिअन नावाच्या टिकटॉकरने शेअर केला आहे. या व्हिडीओला 14 मिलिअनहून अधिक व्ह्यूज आहे. व्हिक्टर हा मजेदार व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी ओळखला जातो. नुकताच त्याने शेअर केलेला व्हिडीओ हा वादाचा असला तरी तो मजेदार आहे. हॉटेलमधील जेवणाच्या टेबलावर बिल आल्यानंतर पार्टीच्या नावाखाली आलेल्या तरुणी एकमेकांशी कशाप्रकारे भांडू लागल्या. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, ज्या मुलीचा वाढदिवस होता तिने तिच्या मित्रमैत्रिणींना हॉटेलमध्ये डिनर पार्टी दिली. मात्र या पार्टीचं बिल चक्क साडेतीन लाख रुपये इतकं आहे. अमेरिकी चलनानुसार 4600 अमेरिकी डॉलर्स बिल आल्यानंतर या लोकांमध्ये वाद सुरु झाला. पार्टी देणाऱ्या तरुणीने बिल सर्वांमध्ये वाटून घेऊयात असं म्हटलं आणि मोफत खाण्यासाठी आलेल्या तिच्या मित्रमैत्रिणींनी वाद सुरु केला. प्रत्येकाने आपआपल्या वाट्याचं बील भरावं असं सांगण्यात आल्यानंतर पार्टीसाठी आलेल्यांनी याला विरोध केला.
पार्टीसाठी उपस्थित असलेल्यांमध्ये व्हिडीओ पोस्ट करणारा व्हिक्टरही उपस्थित होता. त्यानेच या वादाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. "आजही आम्ही गप्पा मारतो. मात्र आमची मैत्री आधीसारखी राहिलेली नाही. आम्ही सर्वकाही लवकरच निस्तरु अशी अपेक्षा आहे. मी केवळ 2 गोष्टी मागवल्या होत्या ज्याची एकूण किंमत 25 डॉलर्स होती. पार्टीसाठी आलेले इतर लोक जास्त गोष्टी मागवत होते. मी फार स्वस्त गोष्टी मागवल्या होत्या," अशी कॅप्शन व्हिक्टरने व्हिडीओला दिली आहे. या व्हिडीओमध्ये व्हिक्टरने, "मी बिल वाटून घेण्याच्या कल्पनेशी संमत नाही. कारण मी फार कमी गोष्टी ऑर्डर केल्या होत्या. दुसऱ्यांचं बिल मी का भरावं?" असंही म्हटलं आहे.
व्हिडीओमध्ये इतर लोक बिल भरण्याच्या मुद्द्यावरुन वाद घालताना दिसत आहेत. एक तरुणी बिल वाटून घेण्यासंदर्भात बोलताना दिसतेय. तर दुसरीकडे अनेकजण ज्याने पार्टी दिली आहे त्यानेच पूर्ण बिल भरावं असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी हा प्रँक व्हिडीओ असल्याचं म्हटलं आहे. या व्हिडीओवर शेकडोच्या संख्येनं कमेंट्स आल्या आहेत.