Google Layoffs: आईचा कॅन्सरने मृत्यू, अंत्यसंस्कारानंतर पोहोचला तर नोकरीवरुन काढून टाकलं, Google च्या कर्मचाऱ्याने मांडली व्यथा

Google ने आतापर्यंत 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं असून अजूनही काही कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. यादरम्यान नोकरी गमावणारे अनेक कर्मचारी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली व्यथा मांडत आहेत. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरनेही आईच्या निधनानंतर कशाप्रकारे नोकरी गेली याबद्दल सोशल मीडियावरुन सांगितलं आहे  

Updated: Jan 27, 2023, 02:35 PM IST
Google Layoffs: आईचा कॅन्सरने मृत्यू, अंत्यसंस्कारानंतर पोहोचला तर नोकरीवरुन काढून टाकलं, Google च्या कर्मचाऱ्याने मांडली व्यथा title=

Google Layoffs: जगातील दिग्गज कंपन्यांपैकी असणाऱ्या Google ने तब्बल 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं आहे. गुगलची पालक कंपनी असणाऱ्या अल्फाबेटमध्ये नोकरकपात करण्यात आल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आहे. कंपनीने नोकरीवरुन काढल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यथा मांडली आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरनेही आपबीती सांगितली असून आईच्या निधनानंतर कशाप्रकारे नोकरीही गेली हे सांगितलं आहे. 

सॅन फ्रान्सिको येथे राहणाऱ्या आयटी कर्मचाऱ्याने एक पोस्ट लिहिली आहे ज्यामध्ये त्यांनी आपल्यावरील वैयक्तिक आणि आर्थिक संकटावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की "कॅन्सरशी झुंज देणाऱ्या आपल्या आईचा डिसेंबर महिन्यात मृत्यू झाला. यामुळे आपण सुट्टीवर गेलो होतो. पण महिन्याच्या सुरुवातीला कामावर परतलो असता काही दिवसांनी आपल्याला आणखी धक्का बसला".

सोशल मीडियावरुन मांडली व्यथा

नोकरी गमावलेल्या या तरुणाने 26 जानेवारीला Linkedin वर लिहिलेल्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे की "मला गेल्या आठवड्यात गुगलने कामावरुन काढून टाकलं. मी दु:खात बुडालेलो असतानाच या गोष्टीची माहिती मिळाली. मी थकलो आहे आणि निराश आहे.  मी आधीच त्रस्त असताना कंपनीने घेतलेला हा निर्णय एक कानाखाली लगावल्यासारखा आहे".

या कर्मचाऱ्याने पुढे म्हटलं आहे की "मी यापेक्षाही वाईट किस्से ऐकले आहेत, जिथे नोकरकपातीमुळे गुगलच्या अनेक कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागली आहे". आपण डिसेंबर 2021 मध्ये गुगलमध्ये नोकरीला लागलो आणि फेब्रुवारी महिन्यात आईच्या कॅन्सरबद्दल माहिती मिळाली असंही त्याने सांगितलं आहे.