Greece Train Accident: ग्रीसमध्ये (Greece) भीषण रेल्वे दुर्घटना झाली आहे. प्रवासी ट्रेनने (Passenger Train) समोरुन येणाऱ्या कार्गो ट्रेनला (Cargo Train) दिलेल्या धडकेत 26 प्रवासी ठार झाले असून, 85 प्रवासी जखमी आहेत. मध्यरात्री हा अपघात झाला असून दुर्घटनेनंतर ट्रेनचे काही डबे रुळावरुन खाली उतरले होते. तसंच तीन डब्यांना आग लागली होती. Tempe येथे हा अपघात झाला असून घटनास्थळी तात्काळ बचावकार्य सुरु कऱण्यात आलं आहे.
Thessaly प्रांताचे गव्हर्नर Konstantinos Agorastos यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धडक फार भीषण होती. दोन्ही ट्रेनमध्ये झालेल्या धडकेनंतर प्रवासी ट्रेनचे चार डबे रुळावरुन घसरले होते. यामधील पहिले दोन डबे तर अक्षरश: उद्ध्वस्त झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे.
रॉयटर्सने स्थानिक प्रसारमाध्यमांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, 250 प्रवासी ट्रेनमधून प्रवास करत होते. यामधील 250 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. घटनास्थळी युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अपघातानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात धूर झाला असून हेड लॅम्पच्या सहाय्याने बचावकार्य सुरु करण्यात आलं.
घटनास्थळावरील मलबा हटवण्यासाठी तसंच अपघातग्रस्त रेल्वे गाड्या उचलण्यासाठी क्रेन आणणार असल्याचं राज्यपालांनी सांगितलं आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात ढिगारा साचला आहे असं ते म्हणाले आहेत. दरम्यान बचावकार्यात मदत करण्यासाठी लष्कराला विनंती करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.