नवी दिल्ली : लष्कर ए तोयबा आणि जमात उद दावाचा म्होरक्या हाफिज सईदनं आपल्यावरचे दहशतवादाचे आरोप हटवण्यात यावेत अशी मागणी युनायटेड नेशन्सकडे (UN) केलीय.
आपल्या घरात नजरबंद असतानाच हाफिजनं लाहोरच्या एका कायदेशीर कंपनीद्वारे (मिर्झा अॅन्ड मिर्झा) यूएनकडे एक याचिका दाखल केली होती. दहशतवाद्यांच्या यादीतून आपलं नाव हटवण्यात यावं, अशी मागणी त्यानं यात केलीय.
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या हाफिज सईदच्या नावाचा 'युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काऊन्सिल'नं १० डिसेंबर २००८ रोजी आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला होता. इतकंच नाही तर २००५ मध्ये हाफिजच्या दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबावर बंदी घालण्यात आली होती. याशिवाय अमेरिकेनं हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करताना त्याच्यावर १० मिलियन डॉलरचं बक्षीस जाहीर केलं होतं.
गेल्या शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी १० महिने नजरबंदीत राहिल्यानंतर हाफिज सईद मोकाट सुटलाय. लाहोर हायकोर्टाच्या समीक्षा बोर्डानं हाफिजला सार्वजनिक सुरक्षेसाठी धोकादायक सांगणारे युक्तीवाद फेटाळून लावलेत.