होळी इस्लाम विरोधात कशी काय? टीकेनंतर पाकिस्तानने 'तो' निर्णय घेतला मागे

पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये होळी साजरी करण्यास आणि खेळण्यावर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तानमधूनच या निर्णयाला विरोध झाला. 

वनिता कांबळे | Updated: Jun 22, 2023, 04:44 PM IST
होळी इस्लाम विरोधात कशी काय? टीकेनंतर पाकिस्तानने 'तो' निर्णय घेतला मागे title=

Holi In Pakistan: शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये होळी साजरी करण्यास आणि खेळण्यावर बंदी घालण्याचा निर्णय  पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने घेतला होता. या निर्णयानंतर सोशल मीडियावर पाकिस्तान सरकारवर जोरदार टीका झाली. यानंतर पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने होळी साजरी करण्यास आणि खेळण्यावर बंदी घालण्याचा निर्णय मागे घेतला आहे.  पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने नवे परिपत्रक जारी करत हा आदेश मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. 

होळी सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल

12 जून रोजी  इस्लामाबादच्या (Islamabad) कायद-ए-आझम विद्यापीठ परिसरात होळी साजरी केली होती. मार्चमध्ये होळीचा सण साजरा केला जायचा. मात्र यंदा विद्यापीठ बंद असल्याने जूनमध्ये होळी सण साजरा करण्यात आला. येथे शिकणारे सर्व धर्माचे विद्यार्थी एकत्र येऊन होळी साजरी करताना दिसले. हजारो विद्यार्थी यात सहभागी झाले होते. या होळी सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले होते.  यानंतर पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने एक परित्रक जारी करत शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये होळी साजरी करण्यास आणि खेळण्यावर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला होता.

पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने का घेतला होळी सेलिब्रेशनवर बंदी घालण्याचा निर्णय?

होळी साजरी करण्यासारखे कार्यक्रम देशाच्या सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत.  सामाजाच्या विरोधात अशा प्रकारचे सण साजरे केल्याने देशाच्या इस्लामिक अस्मितेला हानी पोहोचत आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्याची जबाबदारी  शिक्षण आयोगाची आहे. हे करत असताना पाकिस्तानची संस्कृती आणि परंपरा जपणे देकील तितकेच गरजेचे आहे. सर्व धर्मांचा आदर आहे. तसेच त्यांचे महत्त्व देखील मान्य आहे. पण धर्माबाबत हे स्वातंत्र्य एका मर्यादेपर्यंत आहे अशी कारणे देत   होळी साजरी करण्यास आणि खेळण्यावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले होते. शिक्षण आयोगाने सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना थेट देशाच्या अस्मितेच्या विरोधात असलेल्या उपक्रमांमध्ये सहभागी न होण्याचे आदेशच दिले होते. विद्यापीठातील बिगर राजकीय सांस्कृतिक संघटनेच्या मेहरून विद्यार्थी परिषदेने होळीचा कार्यक्रम आयोजित केला होता.

होळी सेलिब्रेशनवर बंदी घालण्याचा निर्णय मागे का घेतला?

शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये होळी साजरी करण्यास आणि खेळण्यावर बंदी घालण्याचा निर्णय  पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने जाहीर केल्यानंतर टीकेची झोड उठली.  पाकिस्तानी नेत्यांनीच याला विरोध दर्शवला. पाकिस्तानी मीडियाने देखील या निर्णयाविरोधता भूमिका मांडली. पाकिस्तानचे राष्ट्रगीत फारसी भाषेत आहे. तर, रुपयावर तुर्कीचा ध्वज आहे. मग, होळी सणाचे सेलिब्रेशन इस्लामच्या विरोधात कसे काय असू शकते असा सवालच उपस्थित केला जात आहे.