Science Universe: हे विश्वची माझे घर... हे असं म्हणणारे अनेकजण आपण पाहिले असतील. किंबहुना आपणही एकदातरी असं म्हटलंच असेल. या ओळीतील 'विश्व' ही संकल्पना नेमकी कुठून आली तुम्हाला ठाऊक आहे का? जाणून आश्चर्यच वाटेल, कारण विश्वाची निर्मिती होणं हा जणू चमत्कारच आहे. पण, त्यामागंही विज्ञान असून ही संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी आहे याचं चित्र संशोधकांनी समोर आणलं आणि या प्रश्नाच्या उत्तरानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
जगभरातील विविध अंतराळ संशोधन संस्था विश्वाच्या निर्मितीबाबतचे संदर्भ शोधण्यात व्यग्र असतानाच एक अतिशय रंजक माहिती समोर आली. विश्वनिर्मिती कशी झाली, या प्रश्नाचं उत्तर बिग बँग थिअरीमध्ये देण्यात आलं आहे. असं म्हणतात की विश्वाची निर्मिती एका गडद अशा तप्त बिंदूपासून झाली होती. हा एक असा बिंदू होता जो पुढील 13.7 अब्ज वर्षांपर्यंत विस्तारत राहून त्याची कक्षा सातत्यानं रुंदावत राहील. सुरुवातीला या बिंदूचा वेग जास्त असेल, पुढे मात्र ही गती कमी कमी होत जाईल.
13 अब्ज वर्षांपूर्वीच्या विश्वाविषयी सांगावं तर इतक्या आधीच्या कालखंडामध्ये हे सर्वकाही एका लहानशा बिंदूमध्ये सामावलेलं होतं. ज्यानंतर अचानकच अतिशय वेगानं या बिंदूचा विस्तार सुरु झाला. ज्यामुळं विश्वाचा वेग प्रकाशाच्या वेगाहून अधिक वाढला आणि वाढतच राहिला. भौतिकशास्त्रज्ञ एलन गुथ यांनी 1980 मध्ये मांडलेल्या सिद्धांतानुसार हा 'ब्रह्मांडीय इंफ्लेशन'चा कालावधी होता. जो एका सेकंदाच्या तुलनेत काही अंश साधारण 10^-32 पर्यंत असल्याचं सांगण्यात आलं होतं.
नासाच्या दाव्यानुसार ब्रह्मांडाच्या निर्मितीनंतर ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या काही सेकंदांत पूर्ण झाली होती. त्याक्षणी विश्वातील प्रत्येक सूक्ष्म कणाचं तापमान 10 बिलियन डिग्री फ़ारेनहाइट (5.5 बिलियन सेल्सियस) इतकं होतं. सध्याच्या घडीला विश्वात न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन अशा अनेक घटकांची गर्दी असून, इतर सर्व लहानमोठ्या गोष्टी विश्वातील स्फोटाचेच परिणाम असल्याचं सांगण्यात येतं.