कोर्टात पोहोचलेली घटस्फोटाची अनेक प्रकरणं तुम्ही पाहिली असतील. या घटस्फोटांमागे वेगवेगळी कारणं असतात. चीनमधील अशाच एका घटस्फोटाची सध्या चर्चा आहे. याचं कारण या प्रकरणात पतीला लग्नाच्या 16 वर्षानंतर आपण चारही मुलांचा पिता नसल्याचं समजल्याने त्याने कोर्टात धाव घेतली. पत्नी आपली फसवणूक करत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. याप्रकरणी त्याने कोर्टात पुरावेही सोपवले. चीनच्या जियांग्शी प्रांतात हा प्रकार घडला आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात कोर्टात याप्रकरणी सुनावणी झाली होती.
चीनमधील जिशियान नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नीविरोधात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. तसंच पत्नीची ओळख यू के अशी झाली आहे. दक्षिण चीन मॉर्निंग पोस्टनुसार, चेन आणि त्याच्या वकिलांनी काही पुरावे सादर केले आहेत. ज्यामध्ये त्याने आरोप केला होता की, नोव्हेंबर महिन्यात पत्नीने एका मुलीला जन्म दिला होता.
रुग्णालयातील कागदपत्रांमधून माहिती मिळाली की, प्रसूती झाली तेव्हा तिथे एक दुसरी व्यक्ती उपस्थित होती. यावरुन त्याला आपल्या पत्नीचं अफेअर असल्याची शंका आली. सोशल मीडियावर या प्रकरणाची भरपूर चर्चा आहे. युजर्स चेनला देशातील सर्वात दु:खी माणूस म्हणत आहेत. विशेष म्हणजे चेनच्या इतर तीन मुली 2008, 2010 आणि 2018 मध्ये जन्माला आल्या आहेत.
चेन आणि त्याच्या पत्नीत 2022 मध्ये वाद सुरु झाला होता. तेव्हा त्याला कळलं की, आपली पत्नी आपली फसवणूक करत आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये चेनने यूचा पाठलाग करणं सुरु केलं होतं. त्याने रात्रीच्या वेळी पत्नी यूला दुसऱ्या व्यक्तीसह हॉटेलमध्ये पाहिलं होतं.
छोटी मुलगी आपल्यासारखी दिसत नसल्याने चेनला ती आपली नसल्याची शंका आली. डीएनए चाचणीकेली असता त्याची शंका खरी ठरली. यानंतर त्याने तिन्ही मुलींची डीएनए चाचणी केली. यानंतर त्याला तिन्ही मुली आपल्या नसल्याचं धक्कादायक सत्य समजलं. यानंतर त्याने थेट सासर गाठलं आणि याची माहिती दिली. यावेळी त्याचं सासूसोबत भांडणही झालं. या भांडणादरम्यान त्याची सासू खाली कोसळली. पत्नीला ही गोष्ट समजल्यानंतर तीदेखील सासू-सासऱ्यांसोबत भांडण्यासाठी आली. यावेळी चेनच्या वडिलांना ह्रदयविकाराचा झटका आला. प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.
चेनने पत्नीला मुलींचा खरा पिता कोण आहे याबाबत विचारणा केली. पत्नीने म्हटलं आहे की, मुली कित्येक वर्षांपासून त्याला बाप म्हणत आहे. मुलांना डीएनए चाचणीला नेणं हे जनावरांचं काम आहे. मी फसवलं आहे असं मला वाटत नाही. रक्ताचं नातच सर्वात महत्त्वाचं असतं का?.