नवी दिल्ली : भारतीय स्टील आणि अॅल्युमिनियम उत्पादनांवर शुल्क कमी करण्याची मागणी अमेरिकेनं धुडकावून लागल्यानंतर भारतानंही अमेरिकेला त्यांच्याच भाषेत प्रत्यूत्तर दिलंय. अमेरिका आणि इतर विकसित देशांतून आयात होणाऱ्या बदाम, अक्रोड, प्रोटीन कन्सट्रेट अशा वस्तूंवरचं आयात शुल्क १०० टक्के केलंय. अर्थ मंत्रालयाच्या कस्टम्स अॅक्टच्या सेक्शन ८ ए नुसार, आयात शुल्कात वाढ करण्यासाठी आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करण्यात आलाय.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर तसंच सीमा शुल्क बोर्डाच्या (सीबीआयसी) अधिसूचनेनुसार, बदामावर आयात शुल्क ६५ रुपयांवरून १०० रुपये प्रती किलो करण्यात आलंय. प्रोटीन कन्सट्रेटवर आता १० ऐवजी ४० टक्के शुल्क असेल.
गेल्याच आठवड्यात भारत सरकारनं अमेरिकेनं भारताच्या मागणीवर योग्य ते पाऊल उचललं नाही तर अमेरिकेतून आयात करण्यात येणाऱ्या बदाम, अक्रोड, गहू, सफरचंद, मोटारसायकल अशा २० उत्पादनांवर १०० टक्क्यांपर्यंत शुल्क वाढवण्यात येईल, अशी धमकीवजा सूचना केली होती.