पाकिस्तान विरुद्ध मोठ्या कारवाईच्या तयारीत भारत, ४ मोठ्या देशांना दिली माहिती

भारताने ४ महत्त्वाच्या देशांना दिली माहिती

Updated: Feb 22, 2019, 10:23 AM IST
पाकिस्तान विरुद्ध मोठ्या कारवाईच्या तयारीत भारत, ४ मोठ्या देशांना दिली माहिती title=

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकारने कंबर कसली आहे. सरकारने पाकिस्तानला सीमेपलीकडे धडा शिकवण्यासाठी योजना आखली आहे. पण याची वेळ ही गुप्त ठेवण्यात आली आहे. या योजनेला पूर्णत्वास नेण्यासाठी भारताने याची माहिती अमेरिका, रशिया, ब्रिटेन आणि फ्रांससह अनेक महत्त्वाच्या देशांना दिली आहे. यासाठी भारताने अनेक देशांच्या सुरक्षा सल्लागारांना विश्वासात घेतलं आहे.

आज भारताचे सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल ब्रिटेनच्या एनएसए मार्क सॅडविलसोबत चर्चा करुन पाकिस्तान विरुद्ध भारताची काय योजना आहे. याची माहिती देणार आहेत. भारताने आता हे स्पष्ट केलं आहे की, चर्चा करण्याची वेळ संपली असून भारत आता आपल्या सुरक्षेसाठी कारवाई करणार आहे.

इंडिया टीव्हीच्या बातमीनुसार, गुरुवारी अजीत डोवाल यांना रशियाचे सीनियर मोस्ट डिप्टी एनएसए यांची भेट घेतली. रशियामध्ये सुरक्षा सल्लागारांच्या टीमचे चेअरमन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन आहेत. डिप्टी एनएसए आज मास्कोला आले आहेत. आज ते याबाबतची माहिती पुतिन यांना देणार आहेत. याशिवाय अजीत डोवाल यांनी अमेरिकेचे एनएसए यांची भेट घेऊन त्यांना देखील भारत आता काय कारवाई करणार आहे याची माहिती दिली आहे. फ्रांसचे एनएसए यांना देखील अजीत डोवाल यांनी संपूर्ण माहिती दिली आहे.

डिप्लोमसीच्या भाषेत याला ग्लोबल सँक्शन फॉर अॅक्शन असं म्हटलं जातं. याचा अर्थ असा की जर भारतीय जवानांनी काही कारवाई केली तर त्यावर इतर देश आक्षेप घेणार नाहीत.

१४ फेब्रुवारीला पुलावामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. देशभरात संतापाची लाट आहे. पाकिस्तानला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे अशी भावना भारतीय नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे मोदी सरकार आता यापुढे काय पाऊलं उचलते आणि दहशतवाद्यांना कशा प्रकारे उत्तर देते हे पाहवं लागणार आहे.