Twitter Job Cuts : आपल्या आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण येतात, टप्पे येतात. यामध्ये आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपल्याला लागलेली नोकरी (Job). आयुष्यात नोकऱ्या अनेकदा बदलल्या जातात. मात्र यशाच्या पायऱ्या चढताना आपण स्वीकारणारी प्रत्येक नोकरी ही आपल्याला स्पेशल वाटते. किमान सुरुवातीला तरी प्रत्येकाला आनंद देणारीच असते. अशात तुम्हाला परदेशात, जगातील बड्या कंपनीत नोकरी लागली तर बातच काही और. असंच काहीसं घडलं हिमांशू सोबत. हिमांशू याने आयआयटी खडकपूरमधील (IIT Kharagpur) पासआऊट केलं. हिमांशूला मेटा (Meta) कंपनीत म्हणजेच फेसबुक (Facebook) कंपनीत नोकरी लागली. यासाठी हिमांशू भारतातून कॅनडाला (Canada) देखील शिफ्ट झाला. मात्र त्याचा हा आनंद औट घटकेचा राहिला.
जागतिक मंदी आणि नोकऱ्यांवर कुऱ्हाडी
सध्या तुम्ही बातम्यांमधून, सोशल मीडियामधून जागतिक मंदीबाबतच्या (Global Recession) बातम्या ऐकत असाल, वाचत असाल. भारतात जागतिक मंदी जरी येणार नसली तरीही जागतिक मंदीची भारताला झळ नक्कीच बसू शकते. जगभरातील बडया कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे. कर्मचारी कपात करणाऱ्या मोठ्या कंपन्यांमध्ये एक नाव म्हणजे मेटा ( Meta). मेटा कंपनीने जगभरातील 11 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. याच 11 हजार कर्मचाऱ्यांमध्ये हिमांशू देखील होता. हिमांशू दोनच दिवसांपूर्वी कॅनडाला शिफ्ट झाला होता. मात्र दोनच दिवसात हिमांशूला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं.
लिंक्डइनवर शेअर केली आपबिती
फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटाने 11 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली. कंपनीच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर अनेक कर्मचाऱ्यांनी आपली आपबिती मांडली. भारतातील हिमांशूनेही मेटा कंपनी जॉईन केलेली. मात्र कंपनीत रुजू होण्याच्या दोनच दिवसांत त्याच्या हातात नोकरीवरून हटवल्याचं पत्र दिलं.
यावर अनेक नेटकाऱ्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिला आहेत. एका वेगळ्या वेगळ्या खंडातून, एक कर्मचारी दुसऱ्या खंडात कामाला जातो. कंपनीकडे कुणाला काढायचं आहे याची यादी आधीच असेल. मग दोन दिवसात नोकरीवरुन काढण्यामागील कारण समजलं , अशी कमेंट एका नेटकाऱ्याने केली आहे. सध्या अनेकांच्या नोकऱ्या पणाला लागल्यात अशात अनेकांनी आम्हीही सध्या याच परिस्थितीतून जात आहोत, पॉझिटिव्ह राहावं लागेल अशा प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.