सेल्फीच्या नादात भारतीय दाम्पत्याचा अमेरिकेत दरीत पडून मृत्यू

अमेरिकेत ८०० फूट दरीत कोसळून एका भारतीय दाम्पत्याचा मृत्यू झाला.

सुरेंद्र गांगण | Updated: Oct 31, 2018, 05:23 PM IST
सेल्फीच्या नादात भारतीय दाम्पत्याचा अमेरिकेत दरीत पडून मृत्यू title=
Photo courtesy: Facebook/Vishnu.Viswanath25

न्यूयॉर्क : सेल्फीचा मोह सर्वांनाच पडतो. मात्र, अनेक वेळा हा सेल्फीचा मोह जीवघेणा ठरत आहे. सेल्फी घेताना अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील येसेमिटी नॅशनल पार्कच्या टाफ्ट पॉइंट येथून ८०० फूट दरीत कोसळून एका भारतीय दाम्पत्याचा मृत्यू झाला. याबाबतचे वृत्त येथील काही माध्यमांनी दिले आहे.

विष्णू विश्वनाथ (२९) आणि त्यांची पत्नी मीनाक्षी मूर्थी (३०) हे दोघे काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेत फिरण्यासाठी गेले होते. या भारतीय दाम्पत्याने २००६ मध्ये चेंगान्नूर कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरींग केले आहे. दोघांनाही फिरण्याचा छंद होता. ते सातत्याने आपल्या प्रवासाची माहिती ब्लॉगच्या माध्यमातून लिहीत होते.  दरम्यान, हे दोघे दरीत कसे काय पडले ही घटना घडली त्यावेळी ते दोघे तिथे काय करीत होते, याचा शोध स्थानिक पोलीस प्रशासन घेत आहे.

विष्णू त्यांची पत्नी मीनाक्षी कॅलिफोर्नियाच्या योसेमिटी नॅशनल पार्कमधील प्रसिद्ध टाफ्ट पॉइंट या दुर्गम पहाडी भागात पर्यटनासाठी गेली होती. ते दोघे आपल्या प्रवासाची माहिती आपल्या ‘हॉलिडेज अॅण्ड हॅपिली अवर आफ्टर्स’या ब्लॉगवर पोस्ट करत असत.

त्यांनी पोस्ट केलेल्या ब्लॉगमधील काही छायाचित्रांवरुन ते अतिशय धोकादायक ठिकाणांवरुन सेल्फी घेत असल्याचेही स्पष्ट होत आहे. या दाम्पत्याचा ८०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू होण्यापूर्वी ते सेल्फी घेण्याचा प्रयत्न करीत होते असे, विष्णूचा भाऊ जिष्णू विश्वनाथ याने म्हटले आहे. फॉक्स न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे. 

येथील लष्कराच्या जवानांना दरीत दोघांचे मृतदेह आढळून आले होते. यावेळी घटनास्थळी त्यांचा कॅमेरा ट्रायपॉडवर लावलेला आढळून आला. मात्र त्याच्याजवळ कोणीही नव्हते, असे काही पर्यटकांचे म्हणणे आहे. त्यानंतर अखेर सोमवारी हे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.