Chandrayaan 3 ISRO Rocket : भारतीय अंतराळ क्षेत्रातील एक वेगळी क्रांती काही दिवसांपूर्वीच घडली. जिथं (Mission Chandrayaan) चांद्रयान मोहिमेचा आणखी एक टप्पा देशानं ओलांडत चांद्रयान 3 चं यशस्वी प्रक्षेपण केलं. पण, त्यानंतर काही दिवसांतच ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ संशोधन केंद्राकडून किनारपट्टीवरील एका अशा वस्तूचा फोटो समोर आला, ज्यामुळं चिंता वाढली. अनेकांनीच ही वस्तू जणू काही एखाद्या रॉकेटच्या अवशेषांप्रमाणं दिसत असून, ते चांद्रयान 3 चे भाग असल्याचा तर्कही लावला. दरम्यान, तोपर्यंत इस्रोकडून मात्र याबबात कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.
एखाद्या घुमटाप्रमाणं दिसणारे हे अवशेष ऑस्ट्रेलियातील पर्थपासून 250 किमी उत्तरेला असणाऱ्या ग्रीन डेड समुद्रकिनाऱ्यावर आढळून आले. काही तज्ज्ञांच्या मते हे अवशेष 20 वर्षे जुने आहेत. या सर्व चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता इस्रोनं यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. आपल्याच एका जुन्या PSLV रॉकेटचे हे अवशेष असल्याचं इस्रोनं स्पष्ट केलं आहे.
इस्रोनं दिलेल्या माहितीनुसार हे अवशेष भारताच्या रॉकेटचे असले तरीही चांद्रयान 3 शी त्यांचा थेट संबंध नाही. याबाबत माहिती देताना इस्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी सांगितलं, 'सहसा पीएसएलव्ही दक्षिणेलाच लाँच केलं जातं. अशा परिस्थितीमध्ये हे ऑस्ट्रेलियापाशी कोसळलं आणि काही वर्षे समुद्रात वाहत राहिलं. आता त्याचे अवशेष किनाऱ्यापर्यंत वाहत आले.'
इस्रोच्या या माहितीमुळं हे अवशेष हल्लीच प्रक्षेपित करण्यात आलेल्या चांद्रयानाचं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या विचित्र वस्तूला अंतराळातील कचरा म्हणत काहीजणांनी हाच तर्क अंतिम ठरवला होता. पण, आता मात्र त्याची स्पष्टोक्ती झाली आहे.
हे अवशेष बेपत्ता झालेल्या एमएच 370 या विमानाचे असल्याचा अंदाजही अनेकांनीच लावला. 2014 मध्ये 239 प्रवाशांना नेणारं हे विमान पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यानजीकच बेपत्ता झालं होतं. पण, जाणकारांनी या अफवांना पूर्णविराम देत ते रॉकेटचेच अवशेष असल्याचं स्पष्ट केलं.
तिथे ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर असणारे अवशेष चांद्रयान 3 चे नसल्याचं आता स्पष्ट झालेलं असतानाच आता ते नेमकं कुठे पोहोचलं आहे असा प्रश्नही अनेकांनाच पडत आहे. सध्या चांद्रयान 3 पृथ्वीच्याच कक्षेत 51400 x 228 किमीवर परिक्रमण करत आहे. 20 जुलै रोजी दुपारी 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास चांद्रयानाचा प्रवास पुढच्या टप्प्यात नेण्यासाठी आणखी एक बूस्टर फायरिंग बोणार आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस चांद्रयान TLI ( ट्रांस लूनर इंजेक्शन फेज) मध्ये पोहोचेल. थोडक्यात ते पृथ्वीच्या कक्षेतून निघून चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल.