कोरोनावरील लस तयार केल्याचा इटलीचा दावा

याचा प्रयोग मानवी पेशींवरही करण्यात आला आणि त्याचा परिणामही दिसल्याचा दावा करण्यात आला आहे.

Updated: May 6, 2020, 12:01 PM IST
कोरोनावरील लस तयार केल्याचा इटलीचा दावा  title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगातील 190हून अधिक देशांमध्ये थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकोपावर आळा घालण्यासाठी जगातील अनेक देशांकडून या संसर्गावर औषध, लस तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या दरम्यान इटलीकडून कोरोना व्हायरसवरील लस तयार करण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे. इटलीने केलेला हा दावा खरा ठरल्यास संपूर्ण जगासाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. 

इटली सरकारने, कोरोनावरील अँटीबॉडीज शोधले असल्याचा दावा केला आहे. इटलीतील न्यूज एजेन्सी एएनएसएनुसार, रोममधील स्पालनजानी रुग्णालयात लसीवर परिक्षण करण्यात आलं आणि उंदरावर अँटीबॉडीज तयार करण्यात आल्या असून याचा परिणाम दिसला असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

स्पालनजानी रुग्णालयात चाचणी करण्यात आली असून उंदरांवर अँटीबॉडीज तयार करण्यात आल्या आहेत. लसीची तपासणी करण्यासाठी वैज्ञानिकांनी उंदीरांचा वापर केला. संशोधकांनी उंदरावर लसीचं परिक्षण केलं. आणि एकाच लसीकरणानंतर उंदरांनी अँटीबॉडी विकसित केल्या. याचा प्रयोग मानवी पेशींवरही करण्यात आला आणि त्याचा परिणामही दिसला असल्याचा दावा करण्यात आला आहे.

रोममधील लजारो स्पालनजानी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इन्फेक्शन डिसिजच्या संशोधकांनी सांगितलं की, ज्यावेळी याचा वापर मानवी पेशींवर केला गेला त्यावेळी व्हायरस मानवी पेशींमध्ये संक्रमित होऊ शकला नाही. याच्या वापराने पेशींमध्ये आधी संक्रमित झालेला व्हायरस नष्ट झाला. त्यामुळे मानवी शरीरावरही हे अँटीबॉडीज काम करु शकत असल्याचं सांगण्यात आलं आहे. संशोधकांनी या लसीवरील चाचणी अतिशय प्रगतीपथावर असल्याचं सांगितलं आहे. थेट मानवी शरीरावर याची चाचणी उन्हाळ्यानंतर सुरु होऊ शकत असल्याची माहिती आहे. 

हे यूरोपमधील पहिलं रुग्णालय आहे ज्यांनी कोरोना व्हायरसच्या जिनोम सिक्वंसला आयसोलेट केलं होतं.

दरम्यान, याआधी मंगळवारी इस्राईलचे संरक्षण मंत्री बेन्नेट यांनीदेखील कोरोना व्हायरसवरील अँटीबॉडीज तयार करण्यात आल्याचा दावा केला आहे. बेन्नेट यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्राईल इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्चने कोरोनावर अँडीबॉडी विकसित करण्यात यश मिळवलं असल्यास सांगितलं.

आम्ही कोरोनावर लस तयार केली, इस्राईलच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा