नवी दिल्ली : आपल्या तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असलेला इस्राईलने कोरोना विषाणूवर लस बनविल्याचा दावा केला आहे. इस्राईलचे संरक्षणमंत्री नैफताली बेन्नेट यांनी हा दावा केला आहे. त्यांनी म्हटलं की, इस्रायल इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्चने (आयआयबीआर) कोरोना विषाणूवर अंटीबॉडी विकसित करण्यात यश मिळविले आहे.
इस्राईलचे संरक्षणमंत्री नैफताली बेन्नेट यांनी सोमवारी दावा केला की, आयआयबीआर इन्स्टिट्यूट ऑफ इस्त्राईलने कोरोना विषाणूची लस विकसित केली आहे. संस्थेने अंटीबॉडी बनवली आहे. आता वॅक्सीनच्या विकासाची पायरी पुर्ण झाली आहे. आता त्याचे पेटंट आणि मोठ्या प्रमाणात निर्मितीची तयारी सुरू झाली आहे.
आयआयबीआर ही इस्रायलमधील अत्यंत गुप्त संस्था आहे. बाहेरील जगाला येथे केलेल्या प्रयोगांविषयी फारशी माहिती मिळत नाही. पण नेस जिओना भागात असलेल्या या प्रयोगशाळेला भेट दिल्यानंतर नैफताली बेन्नेट यांनी जगभरातील लोकांना लस शोधल्याची बातमी दिली. टाइम्स ऑफ इस्राईलच्या वेबसाईटसह अनेक माध्यमांनी ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
नैफताली बेन्नेट यांनी सांगितले की, ही अँटीबॉडी मोनोक्लोनल पद्धतीने कोरोना विषाणूवर हल्ला करते. त्यामुळे कोरोनाचा विषाणू शरीराच्या इतर भागांमध्ये किंवा दुसर्या व्यक्तींमध्ये पसरत नाही.
इस्राईल इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्च देशाच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. या लॅबने आता ही लस पेटंट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यानंतर हे मोठ्या प्रमाणात तयार केले जाईल जेणेकरुन जगभरातील लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल.
बेन्नेट यांनी म्हटलं की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्पादनासाठी आम्ही जगभरातील कंपन्यांशी बोलू. इस्राईल इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्चच्या संपूर्ण टीमचा मला अत्यंत अभिमान आहे. या लसीची मानवी चाचणी झाली आहे की नाही याबाबत बेन्नेट यांनी माहिती दिली नाही.
इस्राईलचे संरक्षणमंत्री नैफताली बेन्नेट म्हणाले की, इस्राईल आपल्या लोकांचे आरोग्य आणि अर्थव्यवस्था संतुलित करण्याचा प्रयत्न करीत आहे. जर हा दावा खरा ठरला तर कोरोनाचा कहर सहन करणाऱ्या जगासाठी हा आशेचा किरण असेल.
सध्या संपूर्ण जगात 2.52 लाखाहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 36 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. जगभरात, 100 हून अधिक वैज्ञानिकांचा गट यावर लस तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत.
ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठात सर्वात मोठी मानवी चाचणी घेण्यात येत आहे. चीन-अमेरिका देखील या कामात व्यस्त आहे. भारतात देखील कोरोनावर वॅक्सीन बनवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.