लंडन : अमेरिकेचे राष्ट्रपति जो बिडेन यांनी म्हटले आहे की, काबूल विमानतळ पुन्हा एकदा धोक्यात आहे. बिडेनच्या म्हणण्यानुसार, एका लष्करी कमांडरने त्यांना कळवले आहे की, पुढील काही तासांमध्ये तेथे अमेरिकन सैनिक आणि नागरिकांवर आणखी एक प्राणघातक दहशतवादी हल्ला होणार आहे.
खरेतर, राष्ट्राध्यक्ष बिडेन यांच्या राष्ट्रीय सुरक्षा पथकाने त्यांना सांगितले आहे की, काबूलमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. यानंतर व्हाईट हाऊसने चिंता व्यक्त करत खबरदारी घेण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.
त्याचवेळी, आणखी एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानातून लोकांना बाहेर काढण्याच्या मोहिमेचे पुढील काही दिवस आतापर्यंतचा सर्वात धोकादायक काळ सिद्ध होणार आहेत.
अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या पेंटागॉनने शनिवारी सांगितले की, शुक्रवारी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अफगाणिस्तानातील इस्लामिक स्टेटचा स्थानिक सहयोगी ISIS-K चे दोन हाय-प्रोफाइल टार्गेत ठार झाले.
शिन्हुआ या वृत्त संस्थेच्या अहवालानुसार, अमेरिकी लष्कराचे मेजर जनरल हॅक टेलर यांनी पेंटागॉनच्या ब्रीफिंगमध्ये या बातमीला दुजोरा दिला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सांगितले की, पूर्व अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात ड्रोन हल्ल्यात एक ISIS-K नियोजक ठार झाला आहे.
हा हल्ला गुरुवारी काबूल विमानतळाबाहेर झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटानंतर घडला ज्यामध्ये 13 अमेरिकन सेवा सदस्य आणि सुमारे 170 अफगाणी ठार झाले. ISIS-K ने त्या भीषण हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
मात्र, या धमकीनंतर अमेरिकेच्या अध्यक्षांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला आहे की, परिस्थिती कितीही वाईट असली तरी लोकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरूच राहील.