मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा 'मिल्ली मुस्लिम लीग' नवा राजकीय पक्ष

मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद- दावा या दहशतवादी संघटनेचा मोहरक्या हाफिज सईदने आपला राजकीय पक्ष स्थापन केलाय. त्यांने आपल्या पक्षाचे नाव 'मिल्ली मुस्लिम लीग' असे ठेवलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 8, 2017, 10:29 AM IST
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा 'मिल्ली मुस्लिम लीग' नवा राजकीय पक्ष  title=

इस्लामाबाद : मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद- दावा या दहशतवादी संघटनेचा मोहरक्या हाफिज सईदने आपला राजकीय पक्ष स्थापन केलाय. त्यांने आपल्या पक्षाचे नाव 'मिल्ली मुस्लिम लीग' असे ठेवलेय.

 हाफिज सईदने याआधीच आपण राजकारणात येणार असल्याचे संकेत दिले होते. आता आपला राजकीय पक्ष स्थापन करुन पाकिस्तानच्या राजकारणात सक्रीय झालाय.

नवाझ शरीफ काही दिवसांपूर्वी पदावरुन पाय उतार झाले. त्यांना न्यायालयाने जोरदार दणका दिल्याने पंतप्रधानपद सोडावे लागले. पाकिस्तानमध्ये आधीच राजकीय अस्थिरता निर्माण झालेली असताना हाफिज सईदने राजकीय पक्ष स्थापन केल्याने पाकिस्ताकडे जगाचे लक्ष वेधले गेलेय.

जमात-उद-दावाच्या सदस्यांनी इस्लामाबादमध्ये सोमवारी पत्रकार परिषद घेऊन 'मिल्ली मुस्लिम लीग'  या नव्या पक्षाची अधिकृत घोषणा केली. त्यांनी नव्या पक्षाचा लोगो, झेंडा आणि पक्षाचे नावही जाहीर केले. 

तसेच जमात-उद-दावाचे ज्येष्ठ सदस्य सैफुल्लाह खालिद याची 'मिल्ली मुस्लिम लीग' या नव्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात असल्याची घोषणा यावेळी केली. 'पाकिस्तानला वास्तविक इस्लामिक कल्याणकारी देश बनविण्यासाठी आमचा पक्ष काम करेल', असे खालिद यांने म्हटलेय.

दरम्यान, हाफिज सईदचे पाकिस्तान लष्कर आणि आयएसआयशी यांच्याशी संबंध असल्याचे उघड झालेत. त्यामुळे या नव्या पक्षाच्या माध्यामातून लष्कर आणि आयएसआयच्या मदतीने पाकिस्तानच्या राजकारणात पाय रोवण्यास त्याला मदतच होणार असल्याचे बोलले जात आहे. हाफिज सईद गेल्या ६ महिन्यापासून नजर कैदेत आहे.