हेच शिल्लक राहिलेलं; मंदिरातील दानपेटीवर लावला स्वत:चा QR Code; खात्यावर लाखोंची रक्कम जमा

QR Code in temple Viral news : मंदिरात क्यूआर कोड लावणारा नेमका आहे तरी कोण, याची माहिती मिळताच तुम्हालाही धक्काच बसेल.   

सायली पाटील | Updated: Aug 17, 2024, 10:08 AM IST
हेच शिल्लक राहिलेलं; मंदिरातील दानपेटीवर लावला स्वत:चा QR Code; खात्यावर लाखोंची रक्कम जमा title=
Law graduate youth caught stealing more than 3 lakhs from temples with QR code trick

QR Code in temple Viral news : मागील काही वर्षांमध्ये सर्वत ठिकाणी अनेक कामं डिजिटल पद्धतीनं केली जात असून, हल्ली हल्ली तर देवाच्या दारी दिली जाणारी दान स्वरुपातील रक्कमही याच माध्यमातून आकारली जात आहे. याचं उदाहरण अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. पण, वाऱ्याच्या वेगानं पुढे जाणाऱ्या या तंत्रज्ञानाचा एक तोटाही आहे आणि तो म्हणजे फसवणूक. 

सारा देश, सारं जग डिजिटायजेशनच्या वाटेवर निघालेलं असतानाच ऑनलाईन गंडा घालणं असो किंवा मग चुकीच्या पद्धतीनं पैसे लाटणं असो अशीही प्रकरणं आतापर्यंत अनेकदा समोर आली आहे. त्यातच आता आणखी एका धक्कादायक प्रकरणाची भर पडली आहे. कारण, पैशांसाठी इतरांना गंडा घालणाऱ्यांनी देवाचं दारही सोडलं नाही. 

देवाच्या दारातही लबाडी... 

सध्या जागतिक स्तरावरील माध्यमांमध्ये हे प्रकरण चर्चेचा विषय ठरत असून, चीनमधून हे वृत्त समोर आलं आहे. जिथं कायद्याचं शिक्षण घेतलेल्या एका पदवीधरानं बौद्ध मंदिरांमधून दान स्वरुपातील रकमेच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं स्वत:चे खिसे भरले. चोरीची त्याची ही शक्कल पाहून पोलीसही चक्रावले आणि तातडीनं या सुशिक्षित चोराला ताब्यात घेतलं. 

माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आरोपीनं मंगिरांमध्ये असणाऱ्या क्यूआर कोडच्या जागी स्वत:चा क्यूआर कोड लावला. परिणामी ज्या श्रद्धाळूंनी देवासाठी दान स्वरुपात काही रक्कम देऊ केली त्यांच्या खात्यातून ही रक्कम थेट या तरुणाच्या खात्यात जमा झाली. कायद्याचं पदवी शिक्षण घेणाऱ्या या तरुणानं केलेली ही फसवणूक पाहता सामान्यांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे.

हेसुद्धा वाचा : जेवणात झोपेच्या गोळ्या टाकायची, कुटुंब बेशुद्ध झाल्यावर करायची 'हे' काम... मोलकरणीचे कारनामे CCTVत कैद

 

दक्षिण चीनमधील 'मॉर्निंग पोस्ट'च्या वृत्तानुसार या संपूर्ण प्रकरणाचा एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये मंदिरातील भाविक जेव्हा देवापुढं नतमस्तक होतात तेव्हाच हा तरुण तिथं असणाऱ्या दानपेटीवर स्वत:चा क्यूआर कोड लावताना दिसत आहे. ज्यामुळं ज्या ज्या भक्तांनी देवासाठी म्हणून इथं जी काही रक्कम दान केली ती थेट या तरुणाच्याच खात्यात जमा होत राहिली. 

मंदिरात फसवेगिरी करणाऱ्या या इसमाचं नाव अद्याप समोर येऊ शकलेलं नाही. पण, स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार त्यानं गुन्ह्याची कबुली दिली असून, यंदाच्याच वर्षी आपण उत्तर पश्चिमेला असणारं शांक्सी प्रांत आणि दक्षिण पश्चिमेला असणाऱ्या सिचुआन प्रांतासग चोंगकिंग प्रांतातील बौद्ध मंदिरांमध्ये त्यानं ही हायटेक चोरी केली असून, जवळपास 4200 अमेरिकी डॉलर म्हणजेच साधारण 3 लाख 50 हजार रुपये इतकी रक्कम लाटल्याचं म्हटलं जात आहे.