लिबियामध्ये महाभयंकर पूर; आतापर्यंत 3 हजारहून अधिक मृत्यू, हजारो बेपत्ता

Libya Flood: जगाच्या पाठीवर सुरु असणाऱ्या अनेक घटनांनी चिंता वाढवलेली असतानाच लिबियामध्ये आलेल्या महापुरानं विनाशाचं वेगळं आणि भयावहं रुप दाखवलं आहे.   

सायली पाटील | Updated: Sep 13, 2023, 07:46 AM IST
लिबियामध्ये महाभयंकर पूर; आतापर्यंत 3 हजारहून अधिक मृत्यू, हजारो बेपत्ता  title=
Libya Floods Update Over 3000 People Feared Dead thousands missing world news in marathi

Libya Flood: जागतिक स्तरावर घडणाऱ्या अनेक घटनांनी भविष्यातील मानवी अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. कारण, एकामागून एक येणाऱ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. लिबियामध्ये सध्या अशाच एका आपत्तीमुळं प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. जिवीत आणि वित्तहानी झाल्यामुळं लिबिया हे राष्ट्रच कोलमडलं आहे. 

महापूरामुळं लिबियातील बहुतांश शहरं उध्वस्त झाली आहे. या पुराचा सर्वाधिक फटका डेरना शहराला बसला असून इथं चिखलाखाली 700 हून अधिक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत या पुरामध्ये जवळपास 3 हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू ओढावला असून, 10 हजारहून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अतीवृष्टीनंतर बांध तोडून पाण्याचे लोट वाहू लागल्यामुळं लिबियातील अनेक शहरं जलमय झाली. काही भागांमध्ये पुराचं पाणी ओसरत नसल्यामुळं मृतदेहही हाती लागत नसल्यामुळं बचाव यंत्रणांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. 

हेसुद्धा वाचा : महाकाय देवमासे सापळा रचून करतात शिकार; त्यांचं तंत्र पाहून भल्याभल्यांच्या अंगावर काटा; पाहा VIDEO

 

प्राथमिक माहितीनुसार गेल्या 100 वर्षांतील लिबियातील महाभयंकर पुरामध्ये आतापर्यंत अवघ्या 700 मृतदेहांची ओळख पटली असून, बचावकार्यात सहभागी असणाऱ्या 123 जवानांचाही थांगपत्ता लागलेला नाही. तर, 12 जवनांचा यामध्ये मृत्यू ओढावला आहे. परिस्थिती इतकी भीषण आहे की, इथं विमानतळंही नामशेष झाली असल्यामुळं मदतकार्यांमध्ये अडचणी येत आहेत.  

अनेक संसार उध्वस्त... 

लिबियातील शासनानं दिलेल्या माहितीनुसार ज्या भागांमध्ये पुरामुळं नुकसान झालं आहे त्यामध्ये मार्ज, सुसा आणि शाहट या शहांचा समावेश आहे. इथं अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून, पूरग्रस्तांना पूर्व लिबिया आणि बेनगाजी येथे स्थलांतरित करण्यात आलं आहे. इथं शाळा आणि इतर शासकीय इमारतींमध्ये त्यांच्या वास्तव्याची तात्पुरती सोय करण्यात आली आहे. 

डेरना शहरामध्ये पर्वतांवरून वाहत येणाऱ्या नदीच्या पाण्याचे लोट मोठं नुकसान करतच पुढे आले. उंचच उंच इमारतींचंही नुकसान झालं, तर शहरात चारही बाजुंना मृतदेहांचा खच पडल्याचं पाहायला मिळाल्यामुळं या परिस्थितीची दोन हात करायचे कसे, हाच प्रश्न इथं स्थानिकांना पडत आहे.