मसूदचा भाऊ आखतोय भारतात घुसखोरी करुन हल्ल्याचा कट

भारतात दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न

Updated: May 2, 2019, 03:18 PM IST
मसूदचा भाऊ आखतोय भारतात घुसखोरी करुन हल्ल्याचा कट title=

नवी दिल्ली : मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित केल्यानंतर दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा कट आखण्यात आल्याचे समोर आले आहे. अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम या सगळ्या कटामागे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. लाँचिग पॅडवर मोठ्या प्रमाणात अतिरेक्यांना एकत्रित करण्यात येत आहे. तर अफगाणिस्तानात या अतिरेक्यांना ट्रेनिंग देण्यात आलं असून पाकिस्तानी सैन्य देखील या घुसखोरीसाठी मदत करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

बुधवारी दहशतवादाच्या विरोधात लढत असलेल्या भारताला मोठं यश मिळालं होतं. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मौलाना मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं. हा भारताच्या कुटनीतीचा ऐतिहासिक विजय होता. कारण पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलं आहे. भारताने आतापर्यंत लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी हाफिज़ सईदला देखील आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी केली होती. हाफिज सईद मुंबई हल्ल्यातील आरोपी आहे.

कंधार कांडमध्ये त्यानंतर पुलवामामध्ये झालेल्या दहशवतादी हल्ल्यात मसूदचा हात होता. मसूद अजहर जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ३० वर्षापासून भारत विरोधी कारवाया करत आहे. १९९४ मध्ये त्याला श्रीनगरमध्ये अटक करण्यात आलं होतं. पण कंधार विमान अपहरण प्रकरणात त्याला सोडावं लागलं होतं. त्यामुळे भारतासाठी तो चिंतेचा विषय बनला होता. भारतातून सुटल्यानंतर मसूद अजहरने जैश-ए-मोहम्मद नावाची संघटना तयार केली. त्यानंतर भारतात दहशतवादी कारवाया त्याने सुरु केल्या.

२००१ मध्ये संसदेवर हल्ला, २०१६ मध्ये पठानकोट हल्ला, २०१९ मध्ये पुलवामा हल्ला यामध्ये मसूदचा हात होता. जम्मू-काश्मीरमध्ये हिंसा वाढत असल्याने मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणं ही एक मोठी घटना आहे.