Mehran Karimi Nasseri : किती ते दुर्दैव! ज्या व्यक्तीच्या आयुष्यावर साकारला चित्रपट, त्याचा एअरपोर्टवरच दुर्दैवी अंत

एखाद्या चित्रपटाचीच कथा वाटतेय ना ही? हो ही चित्रपटाचीच कथा आहे, पण तीसुद्धा एका सत्य घटनेपासून प्रेरित. त्या चित्रपटाचं नाव आहे..... 

Updated: Nov 16, 2022, 11:22 AM IST
Mehran Karimi Nasseri : किती ते दुर्दैव! ज्या व्यक्तीच्या आयुष्यावर साकारला चित्रपट, त्याचा एअरपोर्टवरच दुर्दैवी अंत  title=
Mehran Karimi Nasseri man behind the inspiration of the terminal movie died on airport

Mehran Karimi Nasseri : एक व्यक्ती, विमानतळावर अडकतो आणि त्यानंतर आयुष्यातली अनेक वर्षे तो तिथंच घुटमळत असतो. दुर्दैवानं त्याला परतीची वाट मिळत नाही आणि मग त्या व्यक्तीच्या जीवनाचा शेवट होतो. एखाद्या चित्रपटाचीच कथा वाटतेय ना ही? हो ही चित्रपटाचीच कथा आहे, पण तीसुद्धा एका सत्य घटनेपासून प्रेरित. त्या चित्रपटाचं नाव आहे ‘द टर्मिनल’ (The Terminal). (Mehran Karimi Nasseri man behind the inspiration of the terminal movie died on airport )

कोण होते मेहरान करिमी नसिरी?

मेहरान करिमी नसिरी या व्यक्तीच्या जीवनावर लोकप्रिय दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग ने 'द टर्मिनल' हा चित्रपट साकारला होता. इराणमधील निर्वासित असणाऱ्या आणि जवळपास गेली 18 वर्षे पॅरिसच्या विमानतळावर आपलं आयुष्य व्यतीत करणाऱ्या करिमी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांनी ज्या विमानतळावर आयुष्यातील बराच काळ घालवला तिथंच अखेरचा श्वास घेतला.

ते तिथं अडकलेच कसे?

नासिरी इराण सोडून बेल्जियमला (Belgium) गेले आणि तिथून ते फ्रान्सला (France) आले. पण, ब्रिटन सरकारनं मात्र त्यांना शरण देण्यास नकार दिला. ज्यामुळं त्यांनी पॅरिसमधील (Paris) चार्ल्स डे गाल विमानतळावरच शरण घेत तिथंच घर थाटलं. टर्मिनल 2 एफ हे त्यांचं घर झालं. सामानानं भरलेल्या ट्रॉली असणाऱ्या बेंचवर ते राहत होते. रोजनिशी आणि वर्तमानपत्रात ते रमत होते. जवळपास 18 वर्षे ते तिथं राहिले. दरम्यानच्या काळात विमानतळावरील कर्मचारी त्यांना अल्फ्रेड या नावाने पुकारू लागले. 1988 ते 2006 पर्यंत ते याच विमानतळावर होते.

वाचा : Office मध्ये कोण कोणाचं नसतं....; IAS अधिकाऱ्याचं हे म्हणणं तुम्हाला पटतंय का?

.... आणि The Terminal साकारला गेला

2004 मध्ये दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग यांनी अभिनेता टॉम हँक्सची मुख्य भूमिका असणारा The Terminal हा चित्रपट साकारला. या एका चित्रपटामुळं सर्वसामान्य नसिरी जगभरात पोहोचले. 2006 मध्ये जेव्हा त्यांची प्रकृती खालावली तेव्हा तब्बल 18 वर्षांनंतर त्यांना विमानतळाबाहेर उपचारांसाठी आणलं गेलं. राजनैतिक अडचणींमुळे अडकलेल्या या व्यक्तीचा हा दुर्दैवी अंत अनेकांच्याच डोळ्यांत पाणी आणून गेला. विश्वास बसणार नाही, शरणार्थी दर्जा मिळूनही ते विमानतळावरच राहिले होते. काही दिवसांपूर्वीच ते या विमानतळावर परतले आणि तिथेच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या सामानात हजारो युरो सापडल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.