close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

न्यूझीलंडमधील मशिदीत गोळीबार; ४० जणांचा बळी

हा हल्ला होण्याच्या काहीवेळापूर्वीच बांगलादेशचा क्रिकेट संघ या मशिदीत आला होता.

Updated: Mar 15, 2019, 01:04 PM IST
न्यूझीलंडमधील मशिदीत गोळीबार; ४० जणांचा बळी

ख्राईस्टचर्च: न्यूझीलंडच्या क्राईस्टचर्च शहरातील एका मशिदीत शुक्रवारी गोळीबार झाल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, ही मशीद ख्राईस्टचर्च शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी मशिदीत अचानकपणे गोळीबाराला सुरुवात झाली. यामध्ये अनेकजण जखमी झाल्याचे समजत आहे. या हल्ल्यात आतापर्यंत ४० जणांचा बळी गेला असून, २० जण गंभीर जखमी असल्याचं कळत आहे. हा हल्ला झाला तेव्हा बांगलादेश क्रिकेट संघातील खेळाडू त्या भागातच उपस्थित होते. मात्र, गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्यांना बसमधून उतरून दिले नाही. यानंतर बांगलादेशी खेळाडुंना घेऊन बस हॅगले ओव्हल या स्टेडियममध्ये गेली. सध्या येथील ड्रेसिंग रुममध्ये बांगलादेशी खेळाडुंना थांबवण्यात आले आहे. यावेळी बांगलादेशी खेळाडुंचे चेहरे चिंताग्रस्त दिसत होते, अशी माहिती क्रिकइन्फो या संकेतस्थळाने दिली. याप्रकरणी चौघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या घटनेनंतर मशिदीच्या परिसराला पोलिसांनी घेरले आहे.

हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने घटनास्थळावरुन पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, हा गोळीबार दहशतवादी हल्ला होता की एखाद्या माथेफिरून गोळीबार केला होता, याचाही शोध सुरु आहे. तसेच सेंट्रल ख्राईस्टचर्चच्या प्रशासनाने लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. मशिदीत ज्यावेळी गोळीबार झाला, तेव्हा तिथे अनेक जण उपस्थित होते. खबरदारीचा उपाय म्हणून शेजारी असलेली दुसरी मशिदही रिकामी करण्यात आली आहे.