नवी दिल्ली : मध्य रात्री भारतीय नियंत्रण रेषेजवळ दोन पाकिस्तानची लढावू विमानांचे उड्डाण झाल्याचे निदर्शनास आले आहे. भारतीय रडारने दोन्ही विमानांची हालचाल टिपली. त्यानंतर भारतीय नियंत्रण रेषेवर एकदम तणाव निर्माण झाला. जम्मू-काश्मीरमधील पाकिस्तानला लागून असणाऱ्या सीमेजवळ ही पाकिस्तानी विमाने उड्डाण करत होती. यावर भारतीय रडार यंत्रणेने बारीक लक्ष ठेवले होते, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने भारतीय वायुसेनाचा हवाल्याने दिले आहे. याआधी २७ फेब्रुवारी पाकिस्तानची दोन लढावू विमाने जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय सीमेचे उल्लंघन केले होते. यावेळी भारतीय हवाई दलाने चोख उत्तर दिले. त्यावेळी पाकिस्तानचे एक मिग १६ हे अत्याधुनिक विमान पाडण्यात आले होते. ते पाकिस्तान हद्दीत कोसळले. त्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने सिमेकडून गोळीबार करण्यात येत आहे. तसेच याआधी पाकिस्तानकडून ड्रोन भारतीय हद्दीत घुसविण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचे आतापर्यंत पाच ड्रोन पाडण्यात आले आहेत.
दरम्यान, जैसलमेर लगत असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेजवळ पाकिस्तानी लष्कराच्या हालचाली वाढल्या आहेत. १५ फेब्रुवारीपासून पाकिस्तानी लष्कराची जमवाजमव सुरु असल्याचे दिसून आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कराचीची चौथी कोअर, लाहौरची पाचवी कोअर तर रावळपिंडीची दहावी कोअर तैनात आहे. भारतीय हद्दीतल्या लोंगोवाल पोस्टसमोर घोटकी भागात ६१ व्या डिव्हीजनने छावणी केली. पाकिस्तानी लष्काराच्या या हालचालींमुळे सीमेवर भारताने हाय अलर्ट जारी केला आहे. तर काल पाकिस्ताच्या दोन लढावू विमानांनी काल रात्री उशिरा भारतीय हद्दीजवळ उड्डाण केले. त्यानंतर भारतीय हवाई दल सर्तक झाले असून या भागातील पाकिस्तानी हवाई दलाच्या प्रत्येक हालचालींवर त्यांचे बारीक लक्ष आहे. प्रचंड वेगात ही विमाने उड्डाण करत होती. या विमानांच्या आवाजामुळे काही काळ या भागात तणाची स्थिती निर्माण झाली होती. भारताने बालकोटमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्ताची लढावू विमाने भारतीय हद्दीत घुसली होती. त्यावेळी भारताने पाकिस्तानच्या हल्ल्याचा प्रयत्न निष्फळ ठरवत त्यांना पिटाळून लावले होते.
भारताने पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ-१६ फायटर विमान पाडले. भारताने आतापर्यंत अनेकदा पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडल्याचा दावा केला आहे. पण पाकिस्तानने त्यांचे एफ-१६ विमान पडल्याचे मान्य केलेले नाही. मंगळवारी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे जे एफ-१६ फायटर विमान पाडले. त्या विमानाचा वैमानिक कोण होता, त्याची ओळख काय आहे त्याबद्दल भारतीय लष्कराकडे माहिती आहे असे सांगितले.