शांघाय सहकार्य परिषदेत मोदींनी इम्रान खान यांना टाळले

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

Updated: Jun 14, 2019, 09:30 AM IST
शांघाय सहकार्य परिषदेत मोदींनी इम्रान खान यांना टाळले title=

बिश्केक: किर्गिझस्तानची राजधानी बिश्केकमध्ये होत असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेत सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेणे टाळले. मोदींनी इम्रान खान यांच्याशी साधे हस्तांदोलनही केले नाही. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या परिषदेत दोन्ही नेते एकमेकांना भेटणार का, याकडेही अनेकांच्या नजरा लागल्या होत्या. 

बिश्केक परिषदेत मेजवानी दरम्यान पंतप्रधान मोदी आणि इम्रान या दोन्ही नेत्यांचे जवळपास एकाचवेळी आगमन झाले. मात्र, यावेळी नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांच्याकडे पाहिले नाही किंवा हस्तांदोलनही केले नाही. तसेच मेजवानीच्या टेबलवर देखील पंतप्रधान मोदींनी इम्रान खान यांच्याशी संवाद टाळला. पुलवामातील हल्ला आणि त्यानंतर बालाकोट एअर स्ट्राईकनंतर दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. तर जोपर्य़ंत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद थांबत नाही तोपर्य़ंत कोणतीही चर्चा शक्य नाही, असा पवित्रा भारताने घेतला होता.

तत्पूर्वी या परिषदेत मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग तसेच रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्याशी पंतप्रधान मोदी यांच्या भेटी घेतल्या. या भेटीतही क्षी जिनपिंग यांच्यासमोर दहशतवादाचा मुद्दा मांडला. दहशतवादाविरुद्ध कठोर पावले उचलण्याची वचने पाकिस्तानने आजपर्यंत पाळलेली नाहीत. त्यामुळे आता द्विपक्षीय चर्चेसाठी पाकिस्तानलाच अनुकूल वातावरण तयार करावे लागेल, असे मोदींनी सांगितले. त्यामुळे आता पाकिस्तान यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.