उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगचा अमेरिकेला गर्भित इशारा

कोरियन प्रदेशाच्या अण्वस्त्रमुक्तीसाठी चर्चा पुढे सरकावी, अशी किम जोंग यांची मागणी आहे

Updated: Dec 30, 2019, 10:21 PM IST
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगचा अमेरिकेला गर्भित इशारा title=

नवी दिल्ली : २०१९ हे वर्ष संपत आलं असताना पुढल्या वर्षात कोरियन प्रदेशातील संभाव्य संघर्षाचे संकेत मिळू लागलेत. किम जोंग उन यांनी ट्रम्प यांना गर्भित इशारा दिलाय. २०१९ हे वर्ष संपत आलेलं असताना उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये तणाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता निर्माण झालीय. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी अमेरिकेसमोर ३१ डिसेंबरची डेडलाईन दिलीय. 

कोरियन प्रदेशाच्या अण्वस्त्रमुक्तीसाठी चर्चा पुढे सरकावी, अशी किम जोंग यांची मागणी आहे. त्यासाठी अमेरिकेनं उत्तर कोरियाबाबत आपली भूमिका अधिक मवाळ केली पाहिजे, असं उत्तर कोरियाचं म्हणणं आहे. याला अर्थातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

या पार्श्वभूमीवर किम जोंग उन यांनी सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 'केआरटी' या सरकारी वाहिनीनं दिलेल्या वृत्तानुसार 'आक्रमक सुरक्षा' उपाय योजणार असल्याचं त्यांनी या बैठकीत जाहीर केलंय. 

दोन दिवस चाललेल्या या बैठकीत परराष्ट्र व्यवहार, संरक्षण सामुग्री उत्पादन आणि सैन्यदल याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचं 'केआरटी'नं म्हटलंय.

उत्तर कोरियाच्या संरक्षण कार्यक्रमावर अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधांमुळे देशाची आर्थिक स्थिती खराब असून यावर तातडीनं उपाय योजण्याची गरज असल्याचं उन यांनी म्हटलंय. आगामी वर्षामध्ये अमेरिका आणि युरोपियन देशांच्या दबावापुढे नमायचं नाही, असाच काहीसा सूर किम जोंग उन यांनी या बैठकीत मांडलाय. 

२०२० हे अमेरिकेसाठीही निवडणूक वर्ष आहे. विरोधकांचा दबाव वाढत असताना दुसऱ्या टर्मला निवडून येण्याचं आव्हान ट्रम्प यांच्यासमोरही आहे. या दोन कमालीच्या विक्षिप्त नेत्यांमुळे येत्या काही दिवसांत कोरियन प्रदेशातली शांतता बिघडण्याची भीती मात्र उत्पन्न झालीय.