उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांची प्रकृती चिंताजनक

ह्रदय शस्त्रक्रियेनंतर मृत्युशी झुंज सुरु असल्याचे वृत्त

Updated: Apr 21, 2020, 11:55 AM IST
उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांची प्रकृती चिंताजनक title=

ब्युरो रिपोर्ट :  उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांच्यावरील ह्रदय शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याची चर्चा आहे. किम जोंग उन यांची मृत्युशी झुंज सुरु असल्याचे वृत्त आहे. अमेरिकन वृत्तवाहिनी सीएनएनच्या वृत्तानुसार किम जोंग उन यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी गंभीर झाली आहे.

दक्षिण कोरियाचं एकीकरण मंत्रालय आणि गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी या बाबत दुजोरा देणं शक्य नसल्याचं म्हटलंय. पण अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्याने सीएनएन या अमेरिकन वृत्तवाहिनीने किम यांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले आहे.

किम जोंग ११ एप्रिल रोजी एका बैठकीत जाहीररित्या शेवटचे दिसले होते. त्यानंतर १५ एप्रिलला त्यांच्या आजोबांच्या जयंतीदिनी होणाऱ्या कार्यक्रमात ते दिसले नाहीत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा सुरु झाली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरु झाली आणि चिंताही व्यक्त होऊ लागली. त्यांच्याबाबत खात्रीशीर माहिती मिळणं कठीण असल्याचं गुप्तचर यंत्रणांनी सांगितलं.

३६ वर्षीय किम जोंग उन यांना ते स्थुल असल्याचा त्रास आहेच, पण त्यांना सिगारेटचं व्यसनही आहे. त्यांच्यावर  कार्डिओव्हस्क्युलर (cardiovascular) साठी उपचार सुरु होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची तब्बेत बिघडली आणि नंतर ती अधिक गंभीर झाली.

किम जोंग उत्तर कोरियातील प्रमुख सार्वजनिक समारंभात सहभागी झाले नाहीत, तेव्हाच त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरु झाली. किम अस्वस्थ आहेत आणि ते घराबाहेर पडण्याच्या स्थितीत नाहीत असं सांगितलं जाऊ लागलं.

 

गेल्या आठवड्यात उत्तर कोरियाचे संस्थापक किम इल सुंग यांची जयंती होती. किम सुंग हे किम जोंग यांचे आजोबा होते. त्यांचा जन्मदिवस उत्तर कोरियात राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्याला किम जोंग यांची प्रमुख उपस्थिती असते. कमसूसन पॅलेसमध्ये किम इल सुंग यांच्या समाधीस्थळी आदरांजली वाहण्यासाठी उत्तर कोरियाचे सगळे मोठे नेते आणि अधिकारी पोहचले, पण किम जोंग मात्र आले नाहीत.  त्यामुळे त्यांच्याबाबत चर्चा सुरु झाली. त्यांच्या स्थुलतेच्या आजाराबाबत नेहमीच चर्चा होते, पण पश्चिमी राष्ट्रातील मीडियाचा दुष्पप्रचार म्हणून या बातम्यांचं उत्तर कोरियाकडून खंडन केलं जातं.