Pakistan : महागाईसह विविध संकटांसोबत लढणाऱ्या पाकिस्तानला आता नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. पाकिस्तानमधील कराचीच्या (Karachi) केमारी भागात 14 मुलांसह 18 जणांचा एका गूढ आजारामुळे (Mysterious disease) मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या दक्षिणेकडील या शहरातील आरोग्य अधिकाऱ्यांनाही अद्याप मृत्यूचे कारण सापडलेले नाही. आरोग्य सेवा संचालक अब्दुल हमीद जुमानी यांनी शुक्रवारी याची माहिती दिली. केमारीच्या मावाच गावात परिसरात 10 ते 25 जानेवारी दरम्यान 14 मुलांसह 18 लोकांचा गूढ आजाराने मृत्यू झालाय, असे अब्दुल जुमानी म्हणाले.
"या मृत्यूंचे कारण शोधण्यासाठी एक आरोग्य पथकाने काम सुरु केले आहे परण आम्हाला शंका आहे की हे मृत्यू समुद्र किंवा पाण्याशी संबंधित असू शकतात कारण हे गाव किनारी भागाच्या अगदी जवळ आहे," असे अब्दुल जुमानी यांनी सांगितले. मावाच गाव हा एक झोपडपट्टी भाग आहे. इथे बहुतेक रोजंदारी करणारे मजूर किंवा मच्छीमार आहेत. मृतांच्या नातेवाइकांनी सांगितले होती मृत्यू झालेल्यांना खूप ताप आला होता आणि श्वास घेण्यास त्रास होत होता.
चौकशीसाठी एक जण ताब्यात
गेल्या दोन आठवड्यांपासून या परिसरातून विचित्र वास येत असल्याची तक्रारही काही लोकांनी केली आहे. यानंतर पर्यावरण विभागाने या भागातील तीन कारखान्यांचे नमुने गोळा केले असून एका कारखाना मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
सोयाबीनमुळे मृत्यू?
"कारखान्यांमधून सोयाबीनचे काही नमुने गोळा केले आहेत. सोया ऍलर्जीमुळे मृत्यू होऊ शकतो असा संशय आहे. हवेमध्ये सोयाबीनच्या कण गंभीर आजार आणि मृत्यूला कारणीभूत ठरू शकतात आणि हवेतील प्रदूषण आणि हवामान यात मोठी भूमिका बजावतात. आम्ही अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही आणि नमुने तपासले जात आहेत," असे सिंध केंद्राचे प्रमुख इक्बाल चौधरी म्हणाले.
कराचीमध्ये याआधी 14 जणांचा मृत्यू
2020 मध्ये कराचीमध्येच विषारी वायू गळतीमुळे 500 हून अधिक लोक आजारी पडले होते. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला होता. गॅस गळती कशी झाली हे अजूनही समोर आले नाही. विषारी वायूमुळे एकाच वेळी अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यावेळी सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या