पाकिस्तान चीन आणि अमेरिकेकडून बेअब्रू... परतवलं ते ''मँगो गिफ्ट''...''मँगो डिप्लोमसी''ची लागली वाट

 पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने (एफओ) बुधवारी अमेरिका आणि चीनसह 32 हून अधिक देशांच्या प्रमुखांना भेट म्हणून आंबे पाठवले.

Updated: Jun 13, 2021, 04:07 PM IST
पाकिस्तान चीन आणि अमेरिकेकडून बेअब्रू... परतवलं ते ''मँगो गिफ्ट''...''मँगो डिप्लोमसी''ची लागली वाट

मुंबई : पाकिस्तानचे आंबे कदाचित त्यांच्या मित्र देशांना आवडले नसावेत. कारण पाकिस्तानने चीन आणि अमेरिकेला भेट म्हणून पाठवलेले आंबे परत केले आहे. खरेतर कोरोना साथीचा आणि आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या पाकिस्तानने नवीन रणनिती आखली आणि जगभरातील अनेक देशांना भेट म्हणून विविध प्रकारचे आंबे पाठवले. परंतु पाकिस्तानची ही 'आंबा डिप्लोमसी' त्याच्या जिवलग मित्र असेल्या चीन आणि अमेरिकेला पसंत आली नाही. ज्यामुळे पाकिस्तानकडून भेट म्हणून आलेले आंबे त्यांनी परत केले.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने (एफओ) बुधवारी अमेरिका आणि चीनसह 32 हून अधिक देशांच्या प्रमुखांना भेट म्हणून आंबे पाठवले. परंतु अमेरिका आणि चीनसारख्या देशांनी कोरोनव्हायरसच्या नियमांचे कारण सांगून ही भेटवस्तू नाकारली.

32 देशांमध्ये 'मॅंगो डिप्लोमसी' वापरण्याचा प्रयत्न

अहवालानुसार पाकिस्तानचे अध्यक्ष डॉ. आरिफ अल्वी यांच्या वतीने 'चौंसा' आंबा 32 देशांच्या राज्य प्रमुख आणि सरकारकडे पाठवला गेला. त्यांची यामागे कोणती रणनिती होती हे काही अद्याप सिद्ध झालेले नाही. इराण, आखाती देश, तुर्की, अमेरिका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि रशिया येथे या चौसा आंब्याचे बॉक्स पाकिस्तानकडून पाठवण्यात आले होते.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या यादीमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचेही नाव होते, त्यांनी मॅक्रॉनलाही आंबे पाठवले परंतु,  यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

चीन आणि अमेरिका व्यतिरिक्त कॅनडा, नेपाळ, इजिप्त आणि श्रीलंका यांनीही पाकिस्तानकडून पाठवलेला आंबा स्वीकारण्यास नकार दिला. ही भेट न स्वीकारण्या मागे त्यांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेला नियमांचे कारण दिले.