कुलभूषण जाधव यांना भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना भेटण्याची संमती

 कुलभूषण यांना भारतातीय राजनैतिक अधिकाऱ्यांना भेटण्याची संमती.

PTI | Updated: Jul 19, 2019, 09:33 AM IST
कुलभूषण जाधव यांना भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना भेटण्याची संमती title=

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारताचे नागरिक कुलभूषण जाधव यांना प्रचंड जागतिक दबावानंतर भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना भेटण्याची संमती पाकिस्तानने दिली आहे. पाकिस्तानने जारी केलेल्या पत्रकात हे स्पष्ट करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशानंतर कुलभूषण जाधव यांना ३६ नुसार त्यांच्या अधिकारांची कल्पना देण्यात आली, असे पाकिस्तानने जाहीर केले आहे. राजनैतिक भेटीसंदर्भातली प्रक्रिया लवकरच जाहीर केली जाईल, असे पाकिस्तानने म्हटले आहे.

इराणमध्ये पाकिस्तानने जाधव यांचे अपहरण करून त्यांच्यावर हेरगिरीचा ठपका ठेवत त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. भारताने त्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागत कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती मिळवली आहे. पाकिस्तानने जाधव यांना राजनैतिक अधिकाऱ्यांना भेटण्याची संमती द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिेले होते. भारताचा हा एक मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे. त्यामुळे पाकिस्तानवर मोठा दबाव आहे. 

दरम्यान, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने केलेली अटक बेकायदा आहे. त्यामुळे पाकिस्तानने जाधव यांची तातडीने मुक्तता करावी आणि त्यांना भारताच्या ताब्यात द्यावे, अशी फेरमागणी केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये त्यांनी याबाबत निवेदन दिले.

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीचा पुनर्विचार करावा, असा निकाल 'द हेग'मधील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला. जाधव यांची बाजू न ऐकता पक्षपाती निकाल दिल्याचा आरोप भारताने केला होता. याच संदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. जाधव यांची बाजू मांडण्याची संधी दिली गेली नाही, हा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मान्य केला.