'पशुपतिनाथ' समितीनं पहिल्यांदाच संपत्ती केली जाहीर

हिंदूचं श्रद्धास्थान असलेलं पशुपतिनाथ हे शंकराचं मंदिर आहे. हे मंदिर पाचव्या शताब्दीत उभारलं गेलंय

Updated: Jun 7, 2019, 11:20 AM IST
'पशुपतिनाथ' समितीनं पहिल्यांदाच संपत्ती केली जाहीर

काठमांडू, नेपाळ : नेपाळस्थित पशुपतीनाथ मंदिरानं पहिल्यांदाच आपल्या संस्थेत जमा झालेल्या संपत्तीचा खुलासा केलाय. मंदिर समितीनं जाहीर केलेल्या आकड्यांनुसार, मंदिराकडे ९.२७६ किलो सोनं, ३१६ किलो चांदी आणि १२० करोड रुपयांची रोख रक्कम जमा झालीय. भक्तांनी मंदिराला केलेल्या दानाचं आकलन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एका समितीनं या संपत्तीची मोजदाद करून या संपत्तीचा खुलासा केलाय. 

'पशुपतिनाथ एरिया डेव्हलपमेंट ट्रस्ट'च्यावतीनं स्थापित करण्यात आलेल्या समितीनुसार, भक्तांनी देवाला केलेलं सोन्या - चांदीचं हे दान १९६२ ते २०१८ पर्यंतचं आहे. पहिल्यांदाच आम्ही पशुपतिनाथ एरिया डेव्हलपमेंट ट्रस्टची संपत्ती सार्वजनिकरित्या जाहीर करत आहोत, असं समितीचे अधिकारी रमेश उप्रेती यांनी यावेळी म्हटलं. 

मंदिराच्या वेगवेगळ्या बँक अकाऊंटमध्ये असलेल्या १२० करोड रुपये रक्कमेशिवाय मंदिराकडे १८६ हेक्टर जमीनही आहे. हिंदूचं श्रद्धास्थान असलेलं पशुपतिनाथ हे शंकराचं मंदिर आहे. हे मंदिर पाचव्या शताब्दीत उभारलं गेलंय.