रॅन्समवेअरच्या 'पेट्या'नं उडवली युरोपची झोप

युरोपवर पुन्हा एकदा सायबर हल्ला झालाय. या सायबर हल्ल्यामुळे युरोपमधल्या बँक आणि कंपन्यांसह ब्रिटिश सरकारचं मंत्रालयही ठप्प झालंय.

Updated: Jun 28, 2017, 11:50 AM IST
रॅन्समवेअरच्या 'पेट्या'नं उडवली युरोपची झोप title=

नवी दिल्ली : युरोपवर पुन्हा एकदा सायबर हल्ला झालाय. या सायबर हल्ल्यामुळे युरोपमधल्या बँक आणि कंपन्यांसह ब्रिटिश सरकारचं मंत्रालयही ठप्प झालंय.

हा व्हायरस रॅन्समवेअरचाच एक भाग असून 'पेट्या' असं त्याचे नाव आहे. या सायबर हल्ल्यामुळे ब्रिटिश बहुराष्ट्रीय जाहिरात आणि जनसंपर्क कंपनी WPPसह अनेक कंपन्या प्रभावित झाल्यात.

सरकारी कामकाज ठप्प

विशेष म्हणजे युक्रेनला सायबर हल्ल्याचा सर्वाधिक फटका बसलाय. युक्रेनमधील वीज कंपन्या, सरकारी कार्यालयांतील संगणकांमध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळतंय. 

गेल्या महिन्यात झालेल्या वन्नाक्राय रॅन्समवेअर सारखाच हा हल्ला आहे. युक्रेनची सेंट्रल बँक, सरकारी वीज वितरक कंपनी युक्रेनेर्गो, विमान निर्माती कंपनी एंतोनोव आणि दोन पोस्ट ऑफिस या व्हायरसला बळी पडलेत.

हा अनपेक्षित हल्ला?

युक्रेनची राजधानी किव्हमधल्या मेट्रोमध्ये पेमेंट कार्डलाही याचा फटका बसलाय. तर पेट्रोल पंपांवरही कामकाज थांबवण्यात आलंय. युक्रेनच्या पंतप्रधानांनी या हल्ल्याला 'अनपेक्षित हल्ला' असं म्हटलंय. युक्रेनच्या उपपंतप्रधानांनी ट्विटर अकाऊंटवर एक फोटो टाकला आहे. त्या फोटोमध्ये यंत्रणा वाईट पद्धतीनं कोलमडल्याचं दिसतंय.

रशिया-ब्रिटनला फटका

गेल्याच महिन्यात रॅन्समवेअर व्हायरसने १०० पेक्षा जास्त देशांत धुमाकूळ घातला होता. या सायबर हल्ल्यामुळे रशिया आणि ब्रिटन या देशांना सर्वाधिक फटका बसला होता. त्यानंतरचा हा सलग दुसरा मोठा हल्ला आहे. एक्सपीसारख्या जुन्या मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या संगणकांना या व्हायरसचा सर्वाधिक धोका आहे.

ऑनलाईन खंडणी

व्हायरसच्या हल्ल्यानंतर संगणक लॉक होतो. तो उघडण्यासाठी व्हायरस 'बिटकॉन'सारख्या आभासी चलनातील ३०० डॉलरची खंडणी मागतो. या व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने एक सुरक्षा पॅच तयार केला असून, तो तात्काळ डाऊनलोड करण्याच्या सूचना ग्राहकांना दिल्यात.