कीव्ह : पाकिस्तान (Pakistan) भारताविषयी कितीही द्वेष पसरवत असला तरी भारताने मात्र कठीण प्रसंगी त्यांच्या मदतीला नेहमीच प्राधान्य दिलं आहे. याचं ताजं उदाहरण युद्धभूमी युक्रेनमध्ये (Ukraine) पाहिला मिळालं आहे. कीव्हमध्ये अडकलेल्या एका पाकिस्तानी मुलीला भारतीय दुतावासाने (Indian Embassy in Kyiv) तिथून बाहेर पडण्यास मदत केली. खुद्द पाकिस्तानी तरुणीने व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
भारतीय दूतावास आणि पंतप्रधानांचे मानले आभार
कीव्हमधून सुखरुप बाहेर पडलेल्या या पाकिस्तानी मुलीने व्हिडओ तयार करत भारतीय दूतावास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत. या व्हिडिओत ती म्हणते, 'माझं नाव अस्मा शफीक (Asma Shafique) आहे आणि मी पाकिस्तानची आहे' मी कीवमधील भारतीय दूतावास आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी मला येथून बाहेर पडण्यास मदत केली.
भारतीय अधिकाऱ्यांनी अस्माला युद्धग्रस्त भागातून सुरक्षितपणे बाहेर काढण्याची आणि पश्चिम युक्रेनला पाठवण्याची व्यवस्था केली आहे, जेणेकरून ती तिथून तिच्या देशात परत जाऊ शकेल.
#WATCH | Pakistan's Asma Shafique thanks the Indian embassy in Kyiv and Prime Minister Modi for evacuating her.
Shas been rescued by Indian authorities and is enroute to Western #Ukraine for further evacuation out of the country. She will be reunited with her family soon:Sources pic.twitter.com/9hiBWGKvNp
— ANI (@ANI) March 9, 2022
भारतीय विद्यार्थ्यांनीही केली मदत
युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी भारत सरकार 'ऑपरेशन गंगा' मोहीम राबवत आहे. या अंतर्गत आतापर्यंत मोठ्या संख्येने भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यात आलं आहे. यापूर्वी भारतीय विद्यार्थी अंकित यादव यानेही एका पाकिस्तानी मुलीला मदत केली होती.
रशियन हल्ल्यात युक्रेनमध्ये अडकलेल्या अंकितने केवळ स्वत:ला वाचवले नाही तर कीवमध्ये शिकणाऱ्या एका पाकिस्तानी मुलीला रोमानियाच्या सीमेवर पोहोचण्यास मदत केली. तेथून त्या विद्यार्थिनीला पाकिस्तानमध्ये सुखरुप नेण्यात आलं.
युक्रेनला कमी लेखण्याची रशियाची चूक
रशिया-युक्रेन युद्धाचा आजा चौदावा दिवस आहे. महाबलाढ्य रशियासमोर युक्रेन सारखा लहान देश किती टीकाव धरेल याबाबत शंका उपस्थित केली जात होती. पण युक्रेनने रशियाला जोरदार उत्तर दिलं आहे. युक्रेनला कमी लेखण्याची चूक रशियाने केली. युद्धात अनेक रशियन सैनिक मारले गेल्याची शक्यता आहे.