शाळेच्या बसला भीषण आग; 25 बालकांचा होरपळून मृत्यू, पंतप्रधानांनाही अश्रू अनावर...

थायलंडची राजधानी बँकॉकमधून हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. एका शालेय बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 2, 2024, 09:20 AM IST
शाळेच्या बसला भीषण आग; 25 बालकांचा होरपळून मृत्यू, पंतप्रधानांनाही अश्रू अनावर... title=

शाळेच्या बसला भीषण आग लागल्याचा धक्कादायक प्रकार थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी ही बस 44 विद्यार्थ्यांना घेऊन सहलीला जात होती. बसला लागलेल्या भीषण आगीत 25 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

जेव्हा उथाई ठाणे परिसरातून विद्यार्थ्यांची ही बस गेली तेव्हा हायवेवर टायर फुटला आणि बसला भीषण आग लागली. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, बसला लागलेली ही आग इतकी भीषण होतकी विद्यार्थी आणि शिक्षकांना बाहेर येणं कठीण झालं आणि आगीतच त्यांचा होरपळून मृत्यू झाला.   

पंतप्रधानांनी व्यक्त केली हळहळ 

पंतप्रधान पँटोगटार्न शिनावात्राने या घटनेवर हळहळ व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं आहे की,'मला शालेय बसला लागलेल्या भीषण आगीबद्दल माहिती मिळाली. या घटनेत अनेक विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. एक आई म्हणून मी मृत आणि जखमींच्या कुटुंबांप्रती माझ्या भावना व्यक्त करु इच्छिते. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे.' पंतप्रधान शिनावात्रा या बोलताना भावूक झाल्या. 

25 जण बेपत्ता 

अपघातानंतर 25 जण अद्याप बेपत्ता असल्याचे परिवहन मंत्री सूर्या जंगरुंगरुंगकिट यांनी सांगितले. "प्रारंभिक अहवालानुसार, बसमध्ये 38 विद्यार्थी आणि 6 शिक्षकांसह 44 लोक होते. आतापर्यंत तीन शिक्षक आणि 16 विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यशस्वी झाले आहेत," अशी माहिती परिवहन मंत्री यांनी दिली.

अपघातानंतर, जळत्या बसचे व्हिडिओ फुटेज देखील समोर आले आहे, ज्यामध्ये ओव्हरपासच्या खाली बसमध्ये मोठी आग लागल्याचे आणि काळ्या धुराचे प्रचंड ढग आकाश व्यापले असल्याचे दिसून येते. आग आटोक्यात आणण्यात आल्याचे बचाव कर्मचाऱ्यांनी सांगितले, परंतु मृतदेह शोधण्यापूर्वी त्यांना बस थंड होण्याची वाट पहावी लागली.