नवी दिल्ली : श्रीलंकेत आत्मघाती बॉम्ब हल्ले घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांनी भारतातही काही ठिकाणांना भेट दिल्याचा महत्त्वाचा खुलासा श्रीलंकेच्या सैन्यदल प्रमुखांनी केला आहे. प्रशिक्षण किंवा श्रीलंकेतील हल्ल्याचे इतर धागेदोरे मिळवण्यासाठी या हल्लेखोरांनी भारतातील काश्मीर, केरळ यांसारख्या ठिकाणांना भेट दिल्याची माहिती त्यांच्याकडून उघड करण्यात आली आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
काही दिवसापूर्वीच ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंका साखळी बॉ़म्बस्फोटाने हादरलं होतं. ज्यानंतर पहिल्यांदाच सुरक्षेच्या प्रश्नाविषयी संबंधित अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती देण्यात आली. यातच गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीतून हल्लेखोर भारतातही येऊन गेल्याची अधिकृत माहिती त्य़ांच्याकडून उघड करण्यात आली आहे. 'बीबीसी'ला दिलेल्या मुलाखतीत ही महत्त्वाची माहिती दिली.
लेफ्टनंट जनरल महेश सेनानायके यांनी याविषयीचा गौप्यस्फोट करत आंतरराष्ट्रीय दहशतवादी विश्वाशीही ते संपर्कात असल्याची शक्यता वर्तवली. 'आमच्याकडे उपलब्ध असणाऱ्य़ा माहितीनुसार ते (हल्लेखोर) भारतातही गेले होते. ते काश्मीर, बंगळुरू आणि केरळमध्येही गेले होते', असं ते म्हणाले. ते नेमके या भागांमध्ये कशासाठी गेले असावेत असा प्रश्न उपस्थित केला असता, याची स्पष्ट कल्पना नसून ते कोणा एका प्रशिक्षणासाठी किंवा देशाबाहेरील आणखी काही दहशतवादी संघटनांशी हल्ल्याशी संबंधित आणखी काही माहिती मिळवण्याच्या उद्देशाने तेथे गेले असावेत अशी शक्यता त्यांनी वर्तवली. दहशतवाद्यांनी भेट दिलेली एकूण ठिकाणं पाहता यात बाहेरील काही संघटना आणि नेतृत्त्वांचाही सहभाग असल्याची शक्यता त्यांनी वर्वली.
भारताकडून वारंवार सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला असतानाही त्याचा गांभीर्याने विचार का केला नाही? या प्रश्नाचंही त्यांनी उत्तर दिलं. गुप्तचर यंत्रणांकडून आम्हालाही काही माहिती मिळाली होती. त्यावेळी परिस्थिती आणि गुप्तचर यंत्रणा या एका बाजूला होत्या आणि बाकी सर्व गोष्टी एका बाजूला. ही दरी आपल्याला आज निदर्शनास येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
सैन्यदल प्रमुख म्हणून गुप्तचर यंत्रणांकडून माहिती एकत्रित करणं, राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्देहाताळणं यासाठी जबाबदार असणारे सर्वजण या परिस्थितीस जबाबदार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. ज्यामधून त्यांनी श्रीलंकेतील राजकीय व्यवस्थेलाही वगळलं नाही.
श्रीलंकेलाच या मोठ्या हल्ल्यात का निशाणा करण्यात आलं, या प्रश्नाचं उत्तर देत सैन्यदल प्रमुखांनी भूतकाळाची पानं उलटली. 'मागील दहा वर्षांमध्ये मिळालेलं प्रमाणाबाहेरील स्वातंत्र्य, शांतता पाहता त्यापूर्वीच्या ३० वर्षांमध्ये काय घडलं होतं याचा साऱ्यांनाच विसर पडला होता. जनतेने शांततेला प्राधान्य देत सुरक्षेच्या मुद्द्यांकडे मात्र दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळालं', असं ते म्हणाले. श्रीलंकेत झालेल्या तीस वर्षांच्या संघर्षाकडे त्यांच्या या वक्तव्याचा रोख होता.