तालिबानने म्हटलं, पाकिस्तान आमचं दुसरं घर, काश्मीरबाबत भारताला दिला हा सल्ला

 तालिबानचे प्रवक्ते झैबुल्लाह मुजाहिद यांनीही भारताशी चांगले संबंध ठेवण्याचा सल्ला दिला पण भारताला एक सल्लाही दिला.

Updated: Aug 26, 2021, 05:52 PM IST
तालिबानने म्हटलं, पाकिस्तान आमचं दुसरं घर, काश्मीरबाबत भारताला दिला हा सल्ला title=

मुंबई : तालिबानने पाकिस्तानला आपले दुसरे घर म्हटले आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने बुधवारी सांगितले की, तालिबानसाठी पाकिस्तान हे दुसरे घर आहे आणि त्यांना शेजारील देशाबरोबर व्यापार आणि सामरिक संबंध मजबूत करायचे आहेत. तालिबानचे प्रवक्ते झैबुल्लाह मुजाहिद यांनीही भारताशी चांगले संबंध ठेवण्याचा सल्ला दिला पण भारताला एक सल्लाही दिला.

पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तालिबानचे प्रवक्ते मुजाहिद म्हणाले, अफगाणिस्तानची सीमा पाकिस्तानशी आहे. जेव्हा धर्माचा प्रश्न येतो तेव्हा आपण पारंपारिकपणे एकमेकांशी संबंधित असतो. दोन्ही देशांचे लोक एकमेकांशी सहजतेने मिसळतात, म्हणून आम्हाला पाकिस्तानसोबतचे आपले संबंध आणखी दृढ करायचे आहेत.

अफगाणिस्तानवर तालिबानच्या नियंत्रणामध्ये पाकिस्तानची कोणतीही भूमिका नाही, असेही मुजाहिद म्हणाले. ते म्हणाले की पाकिस्तानने त्याच्या अंतर्गत प्रकरणात कधीही हस्तक्षेप केला नाही.

भारताशी संबंधांबाबत मुजाहिद म्हणाले, 'भारत हा या प्रदेशाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि भारतासह सर्व देशांशी आम्हाला चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत. आमची एकच इच्छा आहे की भारताने आपली धोरणे अफगाण लोकांच्या हितानुसार ठरवावीत.'
 
मुजाहिद यांनी मुलाखतीत सांगितले की, 'तालिबान अफगाणिस्तानची जमीन कोणत्याही देशाविरुद्ध वापरू देणार नाही. भारत आणि पाकिस्तानमधील तणावावर मुजाहिद म्हणाले की, दोन्ही देशांनी बसून समस्यांवर तोडगा काढला पाहिजे कारण दोन्ही शेजारी देश आहेत आणि दोघांचे हितसंबंध एकमेकांशी जोडलेले आहेत. तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारताने काश्मीरबाबत सकारात्मक भूमिका घेण्याची गरज आहे.'[

अफगाणिस्तानमध्ये तेहरीक-ए-तालिबान आणि इस्लामिक स्टेटच्या उद्रेकाच्या भीतीवर तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'आम्ही यापूर्वीही सांगितले आहे की आम्ही आमची माती इतर कोणत्याही देशाविरुद्ध वापरू देणार नाही. या संदर्भात आमचे धोरण अगदी स्पष्ट आहे. इसिसची अफगाणिस्तानात उपस्थिती नाही.'

गेल्या आठवड्यात अमेरिका आणि आयएमएफने अफगाणिस्तानला दिलेली मदत स्थगित केली. अमेरिकेतील अफगाणिस्तानच्या सर्व मालमत्ताही गोठवण्यात आल्या आहेत. तर, तालिबान सरकार कसे चालवणार? या प्रश्नाला उत्तर देताना तालिबानचे प्रवक्ते म्हणाले, 'आम्ही अद्याप सरकारबाबत निर्णय घेतलेला नाही. सरकार स्थापन झाल्यानंतरच देशाची अर्थव्यवस्था कशी चालवायची हे ठरवले जाईल. मुजाहिद म्हणाले की, तालिबान सरकार बँकिंग आणि कर प्रणाली पुनर्संचयित करेल आणि कृषी-व्यापाराद्वारे देशाची अर्थव्यवस्था मजबूत करेल. गोठवलेले किंवा जप्त केलेले साठे आणि निधी पुनर्संचयित करण्यासाठी प्रयत्न केले जातील.'

'आम्हाला अफगाणिस्तानात एक सरकार हवे आहे जे इस्लामवर आधारित आणि मजबूत आहे. सर्व अफगाणी या सरकारचा भाग असतील. आम्ही त्यावर काम करत आहोत आणि एक मजबूत आणि स्थिर सरकार बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत.'