कोल्डड्रिंकच्या 1 बाटलीची किंमत 36 लाख रुपये! डिस्काउंट पाहिले आणि फसला

अमेरिकेतील (America) एका व्यक्तीला शीतपेयाची  (Cold Drink) संपूर्ण रक्कम न दिल्याबद्दल मोठी किंमत मोजावी लागते.  

Updated: Sep 22, 2021, 11:35 AM IST
कोल्डड्रिंकच्या 1 बाटलीची किंमत 36 लाख रुपये! डिस्काउंट पाहिले आणि फसला title=

वॉशिंग्टन : अमेरिकेतील (America) एका व्यक्तीला शीतपेयाची  (Cold Drink) संपूर्ण रक्कम न दिल्याबद्दल मोठी किंमत मोजावी लागते. आरोपीला 50,000 डॉलर अर्थात 36 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. एवढेच नाही तर त्याला सात वर्षे तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. त्याचवेळी, आरोपी व्यक्तीने न्यायालयाला विनंती केली आहे की, एखाद्या किरकोळ गुन्ह्यासाठी अशी कठोर शिक्षा देऊ नये. 36 लाख देण्यास तो सक्षम नसल्याचे त्याचे म्हणणे आहे.

यामुळे झाली गडबड

'न्यूजवीक'च्या अहवालानुसार, अमेरिकेच्या  पेन्सिल्व्हेनिया येथे राहणाऱ्या 38 वर्षीय जोसेफ सोबोलेव्स्की (Joseph Sobolewski) यांना कोल्ड्रिंक्ससाठी पूर्ण रक्कम न दिल्याबद्दल पोलिसांनी अटक केली आहे. वास्तविक, सोबोलेव्स्की 23 ऑगस्ट रोजी एका दुकानात गेला, जिथे कोल्ड्रिंक्सच्या बाटल्यांवर सवलत दिली जात होती. सवलत असताना सुद्धा तो पूर्ण पैसे न देता निघून गेला.

43 सेंट पेमेंट कमी दिले

दुकानात एक बोर्ड लावला होता. ज्यावर लिहिले होते, '​​3 डॉलरवर दोन बाटल्या'. सोबोलेव्स्कीने काउंटरवर 2 डॉलर दिले आणि बाटली घेऊन निघून गेले. जेव्हा त्याने दोन बाटल्या विकत घेतल्या तरच ही ऑफर मिळणार होती. म्हणजेच, एक बाटली 2.29 डॉलर होती. 1.50 डॉलर नाही. जोसेफ याने 43 सेंट कमी पेमेंट दिले. मात्र, कॅशिअरला हे कळताच तो त्याच्या मागे धावत गेला. पण तोपर्यंत तो तिथून आपल्या कारमध्ये बसून निघून गेला होता.

कॅशिअरने पोलिसांना दिली माहिती 

यानंतर कॅशिअरने पोलिसांना बोलावले. थोड्यावेळाने, पेनसिल्व्हेनिया राज्य पोलिसांनी जोसेफ सोबोलेव्स्कीला पकडले आणि त्याला कैद केले. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले की, सोबोलेव्स्कीला 50,000 डॉलरचा दंड भरावा लागेल. जोसेफ दोषी आढळल्यास त्याला किमान 7 वर्षे तुरुंगवास होऊ शकतो.

तुरुंगवास आधीच झाला आहे

जोसेफला चोरीच्या आरोपावरून तिसऱ्यांदा अटक करण्यात आल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. 10 वर्षांपूर्वी त्याने आपल्या कारमध्ये गॅस भरला आणि पैसे न देता निघून गेला. त्याचप्रमाणे, 2011 मध्ये त्याने दोन चपलांचे जोड चोरले. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. यापूर्वीही त्याने 7 वर्षे तुरुंगात काढली आहेत. वारंवार गुन्हे केल्याबद्दल त्याला इतका दंड ठोठावण्यात आला आहे.