अंत्यसंस्काराची तयारी केली आणि मृत महिला जिवंत झाली

तिच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्काराती तयारीही केली. दरम्यान ती महिला जिवंत असल्याचे समोर आले. 

Updated: Nov 6, 2017, 05:48 PM IST
अंत्यसंस्काराची तयारी केली आणि मृत महिला जिवंत झाली  title=

लखनऊ : जगभरात कुठे काय अजबगजब प्रकार घडतील याचा काही नेम नाही. रुग्णालयात दाखल असलेली ५२ वर्षाची महिला मृत असल्याचे डॉक्टरांनी जाहिर केले. त्यासंबंधी तिच्या नातेवाईकांनाही सांगण्यात आले. त्यानंतर रितीरीवाजाप्रमाणे तिच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्काराती तयारीही केली. दरम्यान ती महिला जिवंत असल्याचे समोर आले. ही घटना लखनऊ येथे घडली आहे.

तालकटोरा येथील रहिवासी असलेल्या शमसुन निसा (५२) यांची प्रकृती खराब झाली होती. त्यानंतर त्यांना केजीएमयू ट्रामा सेंटरमध्ये उपचारासाठी आणण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या मजल्यावरील विभागात दाखल केले.

शमसुन निसा यांची ईसीजी टेक्निशिअननी तपासणी केली आणि त्यानंतर त्यासंबंधीचा अहवाल कनिष्ठ डॉक्टरांना देण्यात आला. या रिपोर्टमध्ये शमसुन यांच्या हृदयाचे ठोके बंद असल्याचे लिहिले होते. डॉक्टरांनी त्या रिपोर्टच्या आधारे शमसुन याच्या नातेवाईकांना त्या मृत असल्याचे सांगितले.

नातेवाईंकांना या बातमीनंतर शोक अनावर झाला होता. त्यानंतर कॅज्युअल्टी विभागात त्यांना मृत्यूचा दाखलाही मिळणार होता. नातेवाईकांनी शमसुन यांच्या अंत्यविधीची तयारीही सुरू केली होती. दरम्यान एक अजब प्रकार समोर आला.
 
शमसुन दाखल असलेल्या कॅज्युअल्टी विभागात अचानक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हालचालींना वेग आला होता. कारण शमसुन यांच्या शरीराची हालचाल होऊ लागली होती. बघता बघता हा प्रकार नातेवाईकांच्याही लक्षात आला. 

नातेवाईकांनी शमसुन यांचा ईसीजी करण्यास सांगितल्यानंतर जे घडले ते सर्वांसाठीच आश्चर्यजनक होते.  शमसुन यांचा ईसीजी नॉर्मल आला होता. आता शमसुन यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. शमसुन यांच्या नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. सर्वांसाठी तो आनंदाचा क्षण होता.