या देशाचा पासपोर्ट आहे सर्वात जास्त 'वजनदार'

जगातला एक देश असा आहे ज्याच्या नागरिकांना कोणत्याही देशात व्हिजासहीत अगदी सहजच एन्ट्री मिळते... 

Updated: Jan 9, 2020, 03:47 PM IST
या देशाचा पासपोर्ट आहे सर्वात जास्त 'वजनदार' title=

नवी दिल्ली : जगभर फिरणं कुणाला आवडणार नाही... दुसऱ्या देशात जाताना तुम्हाला विमान तिकीट आणि हॉटेल्स तर सहजच मिळून जातात... पण कधीकधी व्हिजा मिळवणं अडचणीचं होऊन बसतं. अमेरिका आणि इंग्लंडचा व्हिजा मिळवणं तर बाप रे बाप... सगळ्यात कठिण काम... परंतु, जगातला एक देश असा आहे ज्याच्या नागरिकांना कोणत्याही देशात व्हिजासहीत अगदी सहजच एन्ट्री मिळते... जाणून घेऊयात हा कोणत्या देशाचा पासपोर्ट आहे, जो जगभरात सर्वात जास्त वजनदार ठरतो.

हॅनले पासपोर्ट इंडेक्स - Henley Passport Index नुसार, यावर्षीचा सर्वात वजनदार पासपोर्ट (Powerfull Passport) जपानचा आहे. जपानी पासपोर्ट धारक जगातील तब्बल १९१ देशांत मोफत एन्ट्री किंवा व्हिजा ऑन अरायव्हल सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच, या देशातील नागरिकांना इतर देशांत जाण्यासाठी फारसा विचार करावा किंवा खस्ता खाव्या लागत नाहीत. जपानी पासपोर्ट धारक कोणत्याही देशासाठी तत्काळ रवाना होऊ शकतात. उल्लेखनीय म्हणजे, इमीग्रेशनच्या वेळीही हॉटेल किंवा रिटर्न फ्लाइटचं तिकीट दाखवण्याची सक्ती त्यांना केली जात नाही.

रँकिंगमध्ये भारत ८४ व्या क्रमांकावर

या यादीत भारताचा क्रमांक बराच मागे आहे. रँकिंग (Ranking) च्या संदर्भात जगात भारतीय पासपोर्ट ८४ व्या स्थानावर आहे. भारतीयांना जगातील जवळपास ५८ देशांत व्हिजाची गरज नाही किंवा व्हिजा ऑन अरायव्हल उपलब्ध आहे. 

इराण, कतार, नेपाळ आणि मादागास्करमध्ये भारतीयांना व्हिजा ऑन अरायव्हलची सुविधा उपलब्ध आहे. २०१९ मध्ये भारतीय पासपोर्ट रँकिंगच्या हिशोबानं ८६ व्या क्रमांकावर होता.

सिंगापूर दुसऱ्या क्रमांकावर

गेल्या वर्षापर्यंत सिंगापूर (Singapore) जगभरातील सर्वात वजनदार पासपोर्ट होता. सिंगापूर पासपोर्ट धारक जगातील १९० देशांत बेधडक जाऊ शकतात. यंदा मात्र जपाननं पहिला क्रमांक पटकावल्यानं सिंगापूरला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलंय. 

रँकिंगच्या यादीत दक्षिण कोरिया आणि जर्मनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही देशांचे पासपोर्ट धारक जगातील १८८ देशांत व्हिजाशिवाय प्रवेश मिळवू शकतात.