इटली : इटलीतील एम्पोली येथील कार्लो कॅस्टेलानी स्टेडियमबाहेर एका टीव्ही रिपोर्टरसोबत एक विचित्र घटना घडली. टोस्काना टीव्ही रिपोर्टर ग्रेटा बेकाग्लिया स्टेडियमच्या बाहेरून थेट वार्तांकन करत असताना एका फुटबॉल चाहत्याने येऊन तिला शिवीगाळ केली. तेव्हापासून या प्रकरणावर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
आश्चर्यकारक बाब म्हणजे या स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेचा उद्देश महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे हा होता. पण ते कव्हर करणार्या रिपोर्टरवर हिंसाचार झाला. ग्रेटा लाइव्ह रिपोर्टिंग दरम्यान लोकांशी बोलत असताना, तेवढ्यात मागून दोन फुटबॉल चाहते आले आणि त्यांनी आधी रिपोर्टरच्या हातावर थुंकले, नंतर तिला कानाखाली मारली. या घटनेने ग्रेटा हादरली.
अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर ग्रेटा चाहत्यांना ओरडून म्हणाली, 'माफ करा, तुम्ही माझ्यासोबत हे करू शकत नाही.' तर टोस्काना टीव्हीचे न्यूजकास्टर आणि कार्यक्रमाचे सह-होस्ट ज्योर्जिओ मिशेलेटी यांनी तिला रागावू नका आणि नाराज न होण्याचा सल्ला दिला.
मात्र, संतापलेल्या ग्रेटाने दोन्ही आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत स्थानिक पोलिसांनी सांगितले की, आम्ही आरोपींची ओळख पटवली आहे. त्याचवेळी, तोस्काना टीव्हीने या प्रकरणातील कायदेशीर खर्च उचलण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
त्याचबरोबर ग्रेटा म्हणाली, 'माझ्यासोबत जे घडले ते चुकीचे आहे आणि ते पुन्हा कधीच घडू नये. मी माझे काम करत असताना ते टीव्हीवर लाइव्ह पाहिले गेले. परंतु दुर्देवाने, इतर महिलांसोबत अशा घटना घडतात. मात्र त्याबददल कधीच बोलले गेले नाही. छेडछाडीचे प्रत्येक प्रकरण समोर आले पाहिजे आणि त्यावर कारवाई झाली पाहिजे.