ब्युरो रिपोर्ट : कोरोना व्हायरसवरील लस टोचून घेतलेल्या पहिल्या स्वयंसेवक महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. अखेर स्वयंसेवक महिलेनेच ती जिवंत असल्याचा खुलासा केल्याने याबाबत सुरु झालेली उलटसुलट चर्चा थांबली. या निमित्ताने सोशल मीडियावरील बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर आला.
कोरोना व्हायरसवरील मानवी चाचणीला ब्रिटनमध्ये मान्यता देण्यात आली आहे. ऑक्सफर्ड वॅक्सिन ग्रुप (The Oxford Vaccine Group) द्वारे ही लस तयार केली जाणार असून त्याची चाचणी सध्या सुरु आहे. त्यानुसार ब्रिटनमधील स्वेच्छेने पुढे आलेल्या स्वयंसेवकांना गुरुवारी ही लस देण्यात आली. ही लस घेणाऱ्यांपैकी एक होत्या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. इलिसा ग्रानाटो. दरम्यान, ही लस टोचून घेतल्यानंतर ग्रॅनाटो यांची तब्बेत बिघडली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला असा लेख सोशल मीडियावर फिरू लागला आणि ही माहिती सगळीकडे पसरली.
Dr. Elisa Granato has now protected her Twitter account, but not before tweeting on the bizarre experience of waking up the the news of her alleged death.
It is worth noting that the news media that has posted the article on her untimely demise is not a reputable source.
— Camilla Engelby (@camillaengelby) April 26, 2020
डॉ. इलिसा ग्रानाटो यांच्या मृत्युची बातमी व्हायरल झाल्यानंतर सरकारने ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले. ही बातमी पूर्णपणे असत्य असून ही बातमी सोशल मीडियावरून शेअर केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला.
ग्रानाटो या कोरोना व्हायरसवर विकसित करण्यात येत असलेली लस मानवी चाचणीसाठी टोचून घेणाऱ्या पहिल्या दोनपैकी एक स्वयंसेवक आहेत. त्यांच्या मृत्युबाबत लेख प्रसिद्ध होताच त्यांनी ट्वीटरवरून खुलासा केला. ‘मी जिवंत आहे आणि ठणठणीत आहे,’ असं स्पष्टीकरण त्यांनी दिले.
आरोग्य आणि सामाजिक सेवा विभागाने रविवारी दुपारी ट्वीट करून सांगितले की, “ब्रिटनमधील कोरोना व्हायरस लस चाचणीतील पहिल्या स्वयंसेविकेचा मृत्यू झाल्याची सोशल मीडियावर फिरवण्यात येत असलेली बातमी खोटी आहे. अशा प्रकारे वस्तुस्थितीची खातरजमा न करता सोशल मीडियावर केलेला दावा आणि हानीकारक माहिती रोखण्यासाठी ती खरी आहे की नाही हे शेअर चेकलिस्टचा वापर करून खात्री करून घ्या.’’
शेअर चेकलिस्ट म्हणजे माहिती शेअर करण्यापूर्वी ती खरी आहे की नाही आणि त्या माहितीचा स्त्रोत काय? याबाबतचा प्राथमिक सल्ला. याबाबत सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला मोहीमही सुरु केली होती.
कोविड-१९ मुळे संपूर्ण जग ठप्प झाले आहे. जगभरातले उद्योगधंदे, व्यवहार ठप्प झाले आहेत. जगावर मोठे आर्थिक संकटही आले आहे. त्यामुळे कोविड-१९ वरील लस हाच हे संकट नष्ट करण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे जगभरातले संशोधक कोविड-१९ वरील लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. ऑक्सफर्ड वॅक्सिन ग्रुपही ही लस विकसित करण्याचा प्रयत्न करत असून सप्टेबर महिन्यात दहा लाख लस तयार होतील अशी त्यांना आशा आहे.