कोरोनाच्या संकटात पाकिस्तानला कोणत्याच देशाकडून मदत नाही

कोरोना व्हायरसच्या संकटात असलेल्या पाकिस्तानला अजूनपर्यंत कोणत्याच देशाने आर्थिक मदत केलेली नाही. 

Updated: Apr 27, 2020, 03:39 PM IST
कोरोनाच्या संकटात पाकिस्तानला कोणत्याच देशाकडून मदत नाही title=

इस्लामाबाद : कोरोना व्हायरसच्या संकटात असलेल्या पाकिस्तानला अजूनपर्यंत कोणत्याच देशाने आर्थिक मदत केलेली नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीच याला दुजोरा दिला आहे. इम्रान खान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांसोबत बातचित केली. पाकिस्तानला कोणत्याच देशाकडून एक डॉलरचीही मदत झालेली नाही, असं इम्रान खान म्हणाले.

न्यूज एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान खान म्हणाले 'कोरोनानंतरची स्थिती संपूर्ण जग आणि पाकिस्तानसाठी परीक्षा असेल. युरोप आणि अमेरिकेपेक्षा पाकिस्तानची स्थिती वेगळी आहे. लॉकडाऊनचा दुष्परिणाम पाकिस्तानवर झाला आहे. मला लॉकडाऊन लागू करायचा नव्हता, कारण मजूर आणि रोजंदारीवर कमावणाऱ्यांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. पाकिस्तानमध्ये ७५ टक्के मजूर नोदंणीकृत नाहीत.'

इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेविषयीही चिंता व्यक्त केली. कोरोनामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का लागला आहे. कोणताही देश किंवा जागतिक संघटनेने पाकिस्तानला फुटकी कवडीही दिली नाही, पण आयएमएफने कर्ज फेडण्यासाठी दिलासा दिला आहे, असं इम्रान खान यांनी सांगितलं.

पत्रकारांशी संवाद साधताना इम्रान खान यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. अनेक लोकं सोशल मीडियावर खोटा प्रचार करत आहेत. 'ज्यांनी भ्रष्टाचाराने पैसे कमावले आहेत, त्यांना मीडियाची भीती वाटत आहे, कारण आपला बिंग फुटेल. आयएसआयने ट्रॅक ऍण्ड ट्रेस सिस्टिम सुरू केली आहे. यामुळे कोरोनाचे हॉटस्पॉट शोधायला मदत होईल,' अशी प्रतिक्रिया इम्रान खान यांनी दिली.

पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाग्रस्तांची संख्या १३ हजारांच्या पुढे गेली आहे. तर मृतांचा आकडा २८१ एवढा झाला आहे.