काश्मीर मुद्यावर संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला मोठा झटका

जम्मू काश्मीर मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राच्या खुल्या मंचावरून चर्चा व्हावी, अशी पाकिस्तानची मागणी आहे पण.... 

Updated: Aug 16, 2019, 05:11 PM IST
काश्मीर मुद्यावर संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला मोठा झटका

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्याचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उचलण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसलाय. संयुक्त राष्ट्रानं या मुद्यावर खुल्या चर्चेची पाकिस्तानची मागणी फेटाळून लावलीय. शुक्रवारी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता या मुद्यावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) चीनच्या आग्रहानंतर अनौपचारिक बैठकीसाठी तयार झालंय. परंतु, ही चर्चा एक बंद खोलीत गुप्त पद्धतीनं होणार आहे. परंतु, पाकिस्तानचा यालाही आक्षेप घेतलाय. या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राच्या खुल्या मंचावरून चर्चा व्हावी, अशी पाकिस्तानची मागणी आहे. परंतु, संयुक्त राष्ट्रानं पाकिस्तानची ही मागणी फेटाळून लावलीय.

न्यूज एजन्सी एएफपीला राजनैतिक अधिकाऱ्यांकडून ही माहिती देण्यात आलीय. सुरक्षा परिषदेचे सद्य अध्यक्ष पोलैंड यांनी या मुद्यावर बंद खोलीत अनौपचारिक चर्चा आयोजित केलीय. यामध्ये सुरक्षा परिषदेच्या १५ सदस्यांशिवाय गैर-सदस्यांना सहभागी केलं जात नाही. ही बैठक परिषदेच्या चेम्बरमध्ये न होता एका बाजुच्या खोलीत होणार आहे. पत्रकारांनाही या बैठकीत सहभाग नसेल. 'इंडिया पाकिस्तान प्रश्न' या संयुक्त राष्ट्राच्या अजेंड्यानुसार चीननं या बैठकीचा प्रस्ताव मांडला होता. यामध्ये 'काश्मीर' या शब्दाचा उल्लेख नाही, हे विशेष.

उल्लेखनीय म्हणजे, अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानानं संयुक्त राष्ट्राला पत्र लिहिलंय. या धर्तीवर पाकिस्तानचा मित्र राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीननं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसमोर या मुद्यावर अनौपचारिक बैठकीचा आग्रह मांडला. सुरक्षा परिषदेत चीनसोडून इतर चारही स्थायी सदस्यांनी प्रत्यक्षरित्या भारताची बाजू घेतलीय. हा भारत आणि पाकिस्तानचा द्विपक्षीय मुद्दा असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. तसंच, काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं नुकतंच अमेरिकेनंही म्हटलंय.