अमेरिका-चीन युद्ध पेटलं तर महागाईचा आगडोंब उसळणार? सर्वात मोठे तीन उद्योग संकटात

चीननं तैवानवर हल्ला करण्याचा इशारा दिलाय, तर तैवानच्या बाजूनं अमेरिकाही सरसावलीय

Updated: Aug 3, 2022, 06:47 PM IST
अमेरिका-चीन युद्ध पेटलं तर महागाईचा आगडोंब उसळणार? सर्वात मोठे तीन उद्योग संकटात title=

America China War News : एकीकडे रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू असतानाच आता चीन आणि तैवानमध्येही कोणत्याही क्षणी युद्ध पेटण्याची शक्यता आहे. चीननं तैवानवर (Taiwan) हल्ला करण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे तैवानच्या बाजूनं अमेरिकाही सरसावलीय. त्यामुळे संपूर्ण जगावर युद्धाचं सावट पसरलंय. तसं झालं सर्वच देशांना आर्थिक स्वरूपात युद्धाची झळ बसू शकते. भारतासह अनेक देशांना महागाईची मोठा फटका बसू शकतो. 

युध्दामुळे जगाची अर्थव्यवस्था कोलमडणार ?
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार चीननं तैवानवर हल्ला केला तर ऑटो इंडस्ट्री, स्मार्टफोन इंडस्ट्री आणि सेमीकंडक्टर इंडस्ट्री संकटात येईल. जगभरातील 60 टक्के सेमीकंडक्टरची निर्मिती ही एकट्या तैवानमध्ये केली जाते. युद्धामुळे इथलं उत्पादन बंद झालं तर सेमीकंडक्टरशी निगडीत जगभरातील शेकडो उद्योग ठप्प होतील. 

याचा वाहन उद्योगाला मोठा फटका बसू शकतो. सेमीकंडक्टरचा तुटवडा निर्माण झाला तर वाहनांच्या किंमती वाढू शकतात. याशिवाय तैवानमध्ये अनेक चिपमेकर्स प्लांट आहेत ते बंद पडले तर त्याचा मोबाईल कंपन्यांना फटका बसेल. स्वाभाविकच मोबाईल महागू शकतात आणि सर्वात महत्वांचं म्हणजे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा पुन्हा एकदा भडका उडू शकतो. 

आधीच रशिया-युक्रेन युद्धामुळे अन्नधान्यासह इंधन दरवाढीची झळ सोसावी लागतेय. त्यात चीन-तैवान युद्ध झालं तर महागाईचा मोठा भडका उडेल हे वेगळं सांगायला नकोच.