ज्येष्ठ अभिनेता मुकेश खन्ना आपल्या कठोर आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच त्यांनी सोनाक्षी सिन्हावर टीका करताना म्हटले की, 'आजकालच्या पिढीला 'रामायण' आणि 'महाभारता'बद्दल माहितीच नाही. याला सोनाक्षी सिन्हा हे एक उदाहरण आहे, जिचे ज्ञान या ऐतिहासिक ग्रंथांबद्दल अत्यंत कमी आहे.' याशिवाय, त्यांनी टायगर श्रॉफवरही टीका करताना म्हटले की, 'सध्याचे काही अभिनेते फक्त फिजिक दाखवून सुपरहिरो होण्याचा प्रयत्न करतात, पण सुपरहिरो होण्यासाठी फक्त शरीर नसून योग्य विचारसरणी आणि वर्तन महत्त्वाचे आहे.'
अरुण गोविलसोबत तुलना अपरिहार्य
मुकेश खन्ना यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्यांबद्दल मत व्यक्त केले. ते म्हणाले की, जो कोणी ही भूमिका करतो, त्याला प्रभू श्री रामांच्या व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत असावे लागते. 'अरुण गोविल यांनी प्रभू रामांच्या भूमिकेला सुवर्णमानक दिले आहे. त्यांच्या भूमिकेतील पवित्रता आजही लोकांच्या हृदयात आहे. अशा भूमिकेसाठी निवडलेला अभिनेता फक्त पडद्यावरच नव्हे, तर खऱ्या आयुष्यातही आदर्श असला पाहिजे,' असे त्यांनी सांगितले.
'खऱ्या आयुष्यातील वर्तन पडद्यावर दिसते'
मुकेश खन्ना यांनी पुढे म्हटले की, 'जर एखादा अभिनेता खऱ्या आयुष्यात वाईट सवयींनी ग्रस्त असेल, पार्टी करत असेल किंवा चुकीच्या गोष्टींमध्ये अडकलेला असेल, तर तो पडद्यावर रामाच्या भूमिकेत प्रभावी वाटणार नाही. रामाच्या भूमिकेसाठी केवळ अभिनयच नव्हे, तर व्यक्तिमत्त्वही शुद्ध असले पाहिजे.'
रामायणातील कलाकार
नितेश तिवारीच्या 'रामायण' या महत्त्वाकांक्षी चित्रपटात रणबीर कपूर प्रभू रामाची, साई पल्लवी माता सीतेची, तर कन्नड सुपरस्टार यश रावणाची भूमिका साकारणार आहेत. याशिवाय सनी देओल भगवान हनुमानाची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जाते. हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार असून, पहिला भाग 2026 मध्ये दिवाळीत तर दुसरा भाग 2027 मध्ये प्रदर्शित होईल.
मुकेश खन्नांच्या कमेंट्सची चर्चा
मुकेश खन्नांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्या कठोर मतांनी मनोरंजन क्षेत्रात नवा वाद उभा केला आहे. त्यांच्या मतांमुळे रामायण चित्रपटातील कलाकारांबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.