पाकिस्तानच्या हबीब बँकेवर अमेरिकेने घातली बंदी

अमेरिकेने दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला चांगलाच दणका दिला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 8, 2017, 04:03 PM IST
पाकिस्तानच्या हबीब बँकेवर अमेरिकेने घातली बंदी  title=
Reuters photo

न्यूयॉर्क : अमेरिकेने दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला चांगलाच दणका दिला आहे.

अमेरिकेतील न्यूयॉर्क बँकिंग रेग्यूलेटरने पाकिस्तानच्या हबीब बँकेला बंद करण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नाही तर हबीब बँकेला २२ कोटी डॉलरचा दंडही ठोठावला आहे.

हबीब बँक गेल्या ४० वर्षांपासून न्यूयॉर्कमध्ये सुरु आहे. दहशतवाद, मनी लॉड्रिंग आणि अन्य बेकायदेशीर कामांसाठी बँकेतून व्यवहार झाल्याचा संशय होता. त्यामुळेच बँक बंद करण्याचे आदेश दिल्याचं न्यूयॉर्क बँकिंग अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हबीब बँक ही पाकिस्तानमधील सर्वात मोठी खासगी बँक आहे. न्यूयॉर्क बँकिंग अधिकाऱ्यांनी म्हटले की, बँकेने अनेक निर्देशांचे पालन केले नव्हते. तसेच, मनी लॉड्रिंग आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणा-यांना बँकेतून फंडींग होत असल्याचाही संशय होता.

डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस (DFS)ने हबीब बँकेला २२५ मिलियन डॉलर म्हणजेच (२२ कोटी ५० लाख डॉलर)चा दंड ठोठावला आहे. डीएफएस ही संस्था अमेरिकेतील परदेशी बँकांवर नियंत्रण ठेवते.

हबीब बँक १९७८ पासून अमेरिकेत सुरु होती. २००६ साली बँकेचे काही व्यवहार संशयास्पद वाटले होते. त्यानंतर बँकेला व्यवहारांचं निरीक्षण करण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, बँकेने याकडे दुर्लक्ष केलं होतं.