श्रीनगर : लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून असलेला तणाव आता आणखी वाढला आहे. सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यात एक हिंसक झडप झाली. ज्यामध्ये भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात ही झडप झाली. दोन देशांमधील चर्चेनंतर सर्व काही पूर्वस्थितीवर येत असताना ही घटना घडली.
भारतीय सैन्याने जाहीर केलेल्या अधिकृत माहितीत असे म्हटले आहे की, 'सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात डि-एस्केलेशन प्रक्रियेदरम्यान भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली. यावेळी भारतीय लष्कराचे एक अधिकारी आणि दोन सैनिक शहीद झाले आहेत. हा विषय शांत करण्यासाठी दोन्ही देशांचे वरिष्ठ लष्करी अधिकारी मोठी बैठक घेत आहेत.'
भारत आणि चीन यांच्यात मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच लडाख सीमेजवळ तणावपूर्ण वातावरण आहे. चिनी सैन्याने भारताने निश्चित केलेला एलएसी ओलांडला होता आणि ते गालवान व्हॅलीच्या पेनगाँग लेक जवळ आले आहे. चीनकडून येथे सुमारे पाच हजार सैनिक तैनात होते. याशिवाय अस्त्र-शस्त्र देखील मोठ्या प्रमाणात आणण्यात आले आहे.
हा वाद संपवण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्याकडून पावले उचलली जात होती. 6 जूनपासून सीओ ते लेफ्टनंट जनरल लेव्हल पर्यंतच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहेत. यानंतर दोन्ही देशांच्या सैन्याने काही किमी मागे सरकण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ही प्रक्रिया सुरू असताना दोन्ही देशातील सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली.