रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना नुकतंच सार्वजनिक मंचावर आर्टिफिशिल इंटेलिजन्सबद्दल प्रश्न विचारण्यात आले. प्रश्नोत्तराच्या या कार्यक्रमात पुतिन यांना प्रश्न विचारणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही तर स्वत: पुतिन होते. पण यात एक मोठा ट्विस्ट होता. तो म्हणजे हे पुतिन यांचं AI व्हर्जन होतं. यामुळे एकाच वेळी टीव्हीवर दोन पुतिन दिसत असल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्लादिमीर पुतिन यांनी वार्षिक कार्यक्रमात आपलं AI व्हर्जन पाहिलं तेव्हा काही वेळासाठी त्यांचाही विश्वास बसला नाही. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान AI व्हर्जनने आपण विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याची ओळख करुन दिली. यावेळी त्याने पुतिन यांना न्यूरल नेटवर्क आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स यांच्या धोक्यांकडे कसं पाहता याबद्दल विचारलं.
"हॅलो, मी सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. तुमचे अनेक डबल आहेत असं मी ऐकलं आहे, ते खरं आहे का? न्यूरल नेटवर्क आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स यांच्यामुळे आपल्या आयुष्यात जे धोके निर्माण होत आहेत त्याकडे तुम्ही कसे पाहता?", असा प्रश्न AI व्हर्जनने पुतिन यांना विचारला.
A shocked Vladimir Putin just came face to face with a “deepfake” version of himself on Live TV#Ai #Deepfake #Putin #Russia #Ukraine pic.twitter.com/x0mHPWqQcU
— KISS FRESH (@KlSSfresh) December 14, 2023
हा प्रश्न ऐकल्यानंतर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला होता. यामुळे काही वेळासाठी पुतिनदेखील शांतपणे बसले होते. नंतर ते म्हणाले की, "तू अगदी हुबेहूब माझ्यासारखा दिसत असून, माझ्याच आवाजात बोलत आहेस हे पाहू शकतो. पण मी विचार केला की, फक्त एकच व्यक्ती माझ्यासारखी असली पाहिजे आणि माझ्या आवाजात बोलली पाहिजे ती म्हणजे मी आहे". पुढे ते म्हणाले, "तसं पाहिलं तर हा माझा पहिला डबल आहे".
हा कार्यक्रम पुतिन यांचा रशियन जनतेशी वार्षिक फोन-इन कार्यक्रमत होता. वर्षाअखेरीस घेतल्या जाणाऱ्या पत्रकार परिषदेत त्याचा समावेश करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रशियन नागरिकांना त्यांच्या राष्ट्रपतींशी असंख्य मुद्द्यांवर थेट बोलण्याची संधी मिळते. याच कार्यक्रमात पुतिन यांनी आपल्या AI व्हर्जनच्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं.
पुतिन यांचे एकापेक्षा जास्त बॉडी डबल आहेत असा एक दावा असून, पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांमध्ये याची नेहमीच चर्चा असते. आरोग्याच्या समस्या असल्याने पुतिन यांच्याऐवजी या कार्यक्रमांमध्ये बॉडी डबल सहभागी होतात असाही दावा आहे. पण रशियाने नेहमीच हे आरोप फेटाळले असून, पुतिन यांची प्रकृती ठणठणीत असल्याचं सांगितलं आहे.