मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादमीर पुतीन यांनी आपल्या अध्यक्षपदाचा तोरा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही सोडला नाही. सामन्यानंतर पदकवितरणाच्या वेळी मोठा पाऊस आला. त्यावेळी यजमान पुतीन यांच्या डोक्यावर छत्री होती. पाहुणे फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅकरोन आणि क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्ष कोलिंदा किट्रोविक मात्र पावसात भिजल्या. त्याची छायाचित्र आज सोशल मीडिय़ावर व्हायरल झाली आहे. या प्रसंगानंतर पुतीन यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे.
फ्रान्सनं क्रोएशियाला पराभूत करत दुसऱ्यांदा फुटबॉल विश्वचषकावर आपंल नाव कोरलं. याआधी फ्रान्सनं 1998 मध्ये पहिल्यांदा फुटबॉल विश्वचषकाला गवसणी घातली होती. फ्रान्सनं 1998 मध्ये ब्राझिलला पराभूत करत विश्वचषक जिंकण्याची किमया साधली होती. फ्रान्सला 20 वर्षांनी फुटबॉल विश्वचषकावर आपलं नाव कोरण्यात यश आलं.
फ्रान्सने पूर्वार्धात २ आणि उत्तरार्धात २ असे एकूण ४ गोल केले. तर क्रोएशियाने पूर्वार्ध आणि उत्तरार्धात प्रत्येकी १-१ गोल केला. सामन्याच्या पूर्वार्धात दोनही संघांकडून गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. सामन्याच्या १८व्या मिनिटात फ्रान्सला फ्री किक मिळाली. फ्रान्सला मिळालेल्या फ्री किकचा बचाव करताना क्रोएशियाकडून मॅन्झुकिचने आत्मघातकी ओन गोल केला. त्यामुळे फ्रान्सला आघाडी मिळाली. मात्र, ही आघाडी फार काळ टिकली नाही.
२८ व्या मिनिटाला क्रोएशियाकडून पेरिसिचने गोल करून संघाला बरोबरी साधून दिली. त्यांनतर ३८व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी किक मिळाली. या पेनल्टी किकवर गोल करत ग्रीझमनने फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. या सामन्यात क्रोएशियाच्या संघाने जास्त वेळ चेंडू आपल्याकडेच ठेवला होता.पण फ्रान्सचा संघ हतबल झाला नाही. त्यांनी आपला बचाव मजबूत केला आणि जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी गोल करत विजय साकारला.