युद्धामुळे पुतीनविरोधात तीव्र नाराजी, पुतीननंतर रशियाचा नवा सत्ताधीश कोण?

युक्रेनच्या बाजूनं युरोपियन देश एकवटल्यानंतर रशियानं अण्वस्त्र हल्ल्याचा इशारा देत सा-या जगाचं टेन्शन वाढवलंय.

Updated: Mar 2, 2022, 10:20 PM IST
युद्धामुळे पुतीनविरोधात तीव्र नाराजी, पुतीननंतर रशियाचा नवा सत्ताधीश कोण? title=
प्रातिनिधिक छायाचित्र

नवी दिल्ली : युक्रेनच्या बाजूनं युरोपियन देश एकवटल्यानंतर रशियानं अण्वस्त्र हल्ल्याचा इशारा देत सा-या जगाचं टेन्शन वाढवलंय. अशातच पुतीन यांना रोखण्यासाठी रशियात सत्तापालट होऊ शकते अशीही एक शक्यता व्यक्त होतीय. युद्धामुळे पुतीनविरोधात तीव्र नाराजी आहे. त्यामुळे पुतीन पायउतार झाल्यास रशियाचा नवा सत्ताधीश कोण ? यावरून चर्चेला उधाण आलय. (who will handle the crown if there is a coup in russia know everything)  

युक्रेनविरोधात युद्ध छेडल्यानं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन जगाच्या रडारवर आलेत. त्यात अणुयुद्धाची धमकी देऊन त्यांनी सर्वांचाच रोष ओढवून घेतलाय. युरोपियन देशांनी रशियावर कडक निर्बंध लादले आहेत. ज्याची मोठी झळ रशियाच्या अर्थव्यवस्थेला बसलीय. त्यामुळेच रशियात सत्तापालट होण्याच्या चर्चांना उधाण आलंय. व्लादिमीर पुतीन पायउतार होऊन त्यांच्या जागी दुस-या कुणाच्या तरी हाती रशियाची सूत्र असतील असंही बोललं जातंय. 

सुत्रांच्या माहितीनुसार पुतीन यांच्यानंतर रशियात सर्वात लोकप्रिय असलेले नेते म्हणून जनरल सर्गेई शोईगु यांच्याकडे पाहिलं जातं. रशिया-युक्रेन युद्धात शोईगु यांची भूमिका महत्वपूर्ण राहिलीय...शिवाय पुतीन यांच्यापेक्षा शोईगु यांचं व्यवहारज्ञान अधिक चांगलं आहे. ते युरोपियन देशांसोबत चांगला संवाद साधू शकतात.

जनरल सर्गेई यांच्याप्रमाणे सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पात्रुशेव यांचंही नाव चर्चेत आहे. पात्रुशेव यांनी फेडरल सिक्युरिटी सर्विस ऑफ रशियाची धुरा सांभाळलीय. त्यांचा दृष्टीकोन पुतीन यांच्यासारखाच आहे. 

वालेरी गेरासिमोव, लष्कर प्रमुख 

यात आणखी एक नाव आघाडीवर आहे ते म्हणजे वालेरी गेरासिमोव...2012 पासून रशियाच्या लष्कराची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे. रशियाचे रणनीतीकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 

दिमित्री मेदवेदेव 

2008 मध्ये व्लादिमीर पुतीन यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रशियाचं राष्ट्रपतीपद सांभाळलं ते दिमीत्री मेदवेदेव यांनी..2012 मध्ये पुतीन यांच्या हातात सत्तेची सूत्र आल्यांनतर मेदवेदेव यांना पंतप्रधान बनवण्यात आलं. त्यामुळे त्यांना राष्ट्रपती बनवलं जाऊ शकतं. अर्थात मेदवेदेव हा कमजोर पर्याय असल्याचं जाणकार सांगतायेत. 

मिखाईल मिशुस्तीन, पंतप्रधान 

रशियाचे विद्यामान पंतप्रधान मिखाईल मिशुस्तीन यांना मेदवेदेव यांच्यानंतर पंतप्रधानपदी नियुक्त करण्यात आलं. माजी आयकर अधिकारी अशीही त्यांची ओळख आहे. राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत त्यांचं नाव आघाडीवर आहे. 

युद्धामुळे पुतीन यांना प्रचंड रोषाचा सामना करावा लागतोय. अर्थात रशियाच्या सर्वोच्च पदावरून त्यांना पायउतार करण्याची युरोपियन देशांची रणनिती यशस्वी होणार का? हा खरा प्रश्न आहे.