Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पुराच्या पाण्यात तीन मित्रांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पूराच्या पाण्यापासून वाचण्यासाठी या तिन मित्रांनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवलं. पण दुर्देवाने तिघंही पाण्यात वाहून गेले. घटनास्थळावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये (CCTV) मृत्यूचा हा लाईव्ह थरार कैद झालाय. मिळालेल्या माहितीनुसार हे तिनही मित्र एका ठिकाणी नदीच्या मधोमध अडकले होते.
काय आहे नेमकी घटना?
ही घटना इटलीमधली आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार पॅट्रिजिया कॉर्मोस (20 वर्ष), तिची मैत्रीण बियांका डोरोस आणि तिचा बॉयफ्रेंड क्रिस्टिटन मोलनार अशी मृतांची नावं आहेत. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार हे तिघंही घटनास्थळी फिरायला आले होते आणि नदीत पोहायला उतरले. पण नदीचं पाणी अचानक वाढल्याने त्यांना बाहेर पडता आलं नाही. पाणी वाढल्यानंतर बचावासाठी त्यांनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवलं. पण पाण्याच्या जोरदार प्रवाहात तिघंही वाहून गेलं. काही अंतरावरच दोघांचे मृतदेह आढळले. हे मृतदेह पॅट्रिजिया कॉर्मोस आणि बियांका डोरोस यांचे होते. तर क्रिस्टिटन मोलनारचा अद्याप शोध घेतला जात आहे.
हे तिघंजण पुराच्या पाण्यात (Flood Waters) अडकल्यानंतर नदीच्या काठावर असलेल्या काही पर्यटकांपैकी एकाने तात्काळ अग्निशमन दलाला फोन केला. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पण वाचवण्यापूर्वीच हे तिघं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. अग्निशमन दलाचे प्रमुख जॉर्जिया बासिले यांनी दिलेल्या माहितीनुसार तिघांना वाचवण्यासाठी त्यांच्याकडे दोरखंड फेकण्यात आला. पण नदीचं पाणी वाढलं आणि आमच्या डोळ्यासमोर तीनही मुलं पाण्यात वाहून गेली, असं जॉर्जिया यांनी सांगितलं.
BREAKING - ITALY FLOOD - This is the tragic moment where three friends Patrizia, Bianca and Molnar were seen hugging each other seconds before being swept away in a flash flood in Italy.
They were last seen on Friday.
-Daily Mail#Italy #Flood #Emergency #Breaking #Sad pic.twitter.com/TJnBYoNAsu
— T R U T H P O L E (@Truthpolex) June 2, 2024
इटलीतील प्रेमरियाको शहराचे महापौर मिशेल डी सबाटा यांनी या तीन मुलांच्या मृत्यबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रेमरियाको या शहरात ही घटना घडलीय. प्रेमरियाको शहरात राहाणाऱ्या लोकांना या नदीबद्दल माहिती आहे. त्यामुळे या ठिकाणी फारसे कोणी जात नाही, असं महापौर मिशेल यांनी सांगितलं. ही तीन मुल ज्यावेळी नदीत उतरली त्यावेळी नदीच्या पात्रात पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे ही तीन मुलं नदीत आतपर्यंत गेली. पण अचानक नदीत पाण्याचा प्रवाह वाढला आणि या मुलांना बाहेर पडता आलं नाही अशी माहितीही महापौर मिशेल यांनी दिली.
दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तरुण मुलांच्या मृत्यूने शोक व्यक्त केला जात आहे.